
शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धा ः ग्यानोजी गायकवाड, लहू लोहार, यश यादव, अरुण दाणी चमकले
छत्रपती संभाजीनगर ः ३२व्या शहीद भगतसिंग करंडक औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत कॅनरा बँक, रुचा इंजिनिअरिंग आणि वन विभाग या संघांनी दणदणीत विजयासह आपली आगेकूच कायम ठेवली. या सामन्यांत ग्यानोजी गायकवाड, लहू लोहार, यश यादव आणि अरुण दाणी यांनी चमकदार कामगिरी नोंदवत सामना गाजवला.

गरवारे क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या कॉस्मो फिल्म्स प्रायोजित व शहीद भगतसिंग क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आयोजित शहीद भगतसिंग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळवल्या गेलेल्या पहिल्या उप उपांत्यपूर्व सामन्यात कॅनरा बँक संघाने होमिओपॅथिक डॉक्टर्स संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. दुसऱ्या सामन्यात रुचा इंजिनिअरिंग संघाने बजाज ऑटो संघाचा ५८ धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यात वन विभाग संघाने एसटी सेंट्रल वर्कशॉप संघावर ६ गडी राखून विजय संपादन केला. बजाज ऑटो संघाकडून एकाकी लढत देत अष्टपैलू कामगिरी बजावत अरुण दाणी यांची अष्टपैलू कामगिरी २५ धावा व ३ महत्वपूर्ण गडी बाद केले.
पहिला सामना होमिओपॅथिक डॉक्टर्स व कॅनरा बँक या संघांदरम्यान खेळवण्यात आला. कॅनरा बँक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. होमिओपॅथिक डॉक्टर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ बाद १४७ धावा केल्या. यामध्ये मयूर राजपूत याने २८ चेंडूत १ षटकार व १ चौकारासह ३५ धावा,रबमीतसिंग सौदी याने २० चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह ३१ धावा तर कार्तिक बाकलीवाल याने ३३ चेंडूत १ षटकार व १ चौकारासह २५ धावांचे योगदान दिले. श्रीहर्ष पाटील याने २२ धावात २ गडी, ऋषिकेश निकम याने २३ धावात २ गडी तर कर्णधार ग्यानोजी गायकवाड व आकाश बोराडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात कॅनरा बँक संघाने विजयी लक्ष केवळ १४ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये कर्णधार ग्यानोची गायकवाड याने अप्रतिम खेळी करताना केवळ २३ चेंडूत ५ उत्तुंग षटकार व ३ चौकारांसह ५२ धावा, आकाश बोराडे याने २३ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ५ चौकारांसह ४१ धावा, दुर्गेश साळुंखे याने २१ चेंडूत ४ चौकारांसह २७ धावा तर प्रणित दीक्षित याने १४ चेंडूत १ चौकारासह १६ धावांचे योगदान दिले. होमिओपॅथिक डॉक्टर्स संघातर्फे गोलंदाजी करताना लक्ष्मण सूर्यवंशी व कपिल पल्लोड यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

दुसरा सामना बजाज ऑटो व रुचा इंजिनिअरिंग या संघांदरम्यान खेळवण्यात आला. बजाज ऑटो संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रुचा इंजिनिअरिंग संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १४४ धावा केल्या. यामध्ये मयंक विजयवर्गीय याने २८ चेंडूत १ षटकार व २ चौकारांसह ३५ धावा, सचिन नायर याने २७ चेंडूत ३ चौकारासह २५ धावा, सोहम नरवडे याने १० चेंडूत ३ चौकारांसह २५ धावा तर निखिल सांगळे याने ८ चेंडूत १ चौकारासह १० धावांचे योगदान दिले. बजाज ऑटो संघातर्फे गोलंदाजी करताना जतिन लेखवार याने १४ धावांत ३ गडी, अरुण दाणी याने २१ धावांत ३ गडी तर दीपक कुमार व कर्णधार सागर तळेकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात बजाज ऑटो संघ १४ षटकात ८६ धावातच गडगडला. यामध्ये अरुण दाणी याने १८ चेंडूत ५ चौकारांसह आक्रमक २५ धावा फटकावल्या. विनायक महाजन याने २१ चेंडूत १ षटकार व १ चौकारासह १६ धावा तर कर्णधार सागर तळेकर याने ८ चेंडूत २ चौकारांसह १० धावांचे योगदान दिले. रुचा इंजिनिअरिंग संघातर्फे गोलंदाजी करताना लहू लोहार याने केवळ ६ धावात ३ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. तर त्याला साथ देताना ऋषिकेश कदम २१ धावात ३ गडी, मयंक विजयवर्गीय याने १४ धावात २ गडी तर सचिन नायर याने २७ धावात १ गडी बाद केला.

तिसरा सामना वन विभाग व एसटी सेंट्रल वर्कशॉप या संघांदरम्यान खेळवण्यात आला. एसटी सेंट्रल वर्कशॉप संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १०४ धावा केल्या. यामध्ये राजेंद्र सोनकांबळे याने ४८ चेंडूत १ षटकार व ६ चौकारांसह ४३ धावा तर रवींद्र बोर्डे याने ४६ चेंडूत ५ चौकारांसह ३५ धावांचे योगदान दिले. वन विभाग संघातर्फे गोलंदाजी करताना कर्णधार आनंद गायके याने १६ धावात २ गडी तर मोहम्मद शमीम व सय्यद तल्हा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात वन विभाग संघाने विजयी लक्ष केवळ ८ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामध्ये यश यादव याने २३ चेंडूत २ उत्तुंग षटकार व ७ चौकारांसह ५१ धावा व सचिन डांगे याने १५ चेंडूत १ षटकार व ६ चौकारांसह ३५ धावांचे योगदान दिले. एसटी सेंट्रल वर्कशॉप संघातर्फे गोलंदाजी करताना संतोष सातरे याने १७ धावात २ गडी तर संजय नागरगोजे व राजेंद्र सोनकांबळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
या सामन्यांमध्ये पंचाची भूमिका राकेश सूर्यवंशी, हसन जमा खान, सुनील बनसोडे, विशाल चव्हाण, अजय देशपांडे, कमलेश यादव तर गुणलेखकाची भूमिका किरण भोळे यांनी पार पाडली, असे संयोजन समितीचे सदस्य व शहीद भगतसिंह क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर मानकापे यांनी सांगितले.
शनिवारी होणारे सामने
वैद्यकीय प्रतिनिधी ‘अ’ व जिल्हा वकील ‘अ’ (सकाळी ७.१५ वाजता)
शहर पोलीस व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (सकाळी ११ वाजता)
कंबाईंड बँकर्स व रुचा इंजिनिअरिंग (दुपारी २ वाजता)