
रेल्वेची स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धा ः यश चव्हाण, शितलकुमार सामनावीर
सोलापूर ः परेल वर्कशॉप मुंबई व ख्वाजा बंदेनवाज क्रिकेट अकादमीने रेल्वेच्या ७८व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेतील ब गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात झालेल्या उपांत्य सामन्यात परेल वर्कशॉपने साऊथ सोलापूर ओल्ड संघास ८ गडी राखून हरवले. नाबाद ३६ धावा फटकाविणारा यश चव्हाण सामन्याचा मानकरी ठरला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात शितलकुमारच्या भेदक गोलंदाजीमुळे (पाच बळी) ख्वाजा बंदेनवाज क्रिकेट अकादमीने मारिया क्रिकेट क्लबवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळविला. यात एक इनिंग संपल्यावर पाऊस आल्यामुळे सिंपल रन रेटच्या आधारावर दुसरी इनिंग १४ षटकाची करण्यात आली. यात केबीएनसीए संघाला १४ षटकात ७० धावांचे लक्ष्य देण्यात आले. त्यांनी ते ८.१ षटकांत सहज गाठले. शितलकुमार सामनावीर ठरला.

हे पुरस्कार तरुण भारतचे वृत्तसंपादक अजितकुमार संगवे व रेल्वेचे लियाकत शेख यांच्या हस्ते देण्यात आले. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून किरण डिग्गे व सुहैल शेख आणि नंदकुमार टेळे व सचिन गायकवाड तर गुणलेखक म्हणून गेनबा सुरवसे यांनी काम पाहिले.

संक्षिप्त धावफलक ः १) साऊथ सोलापूर ओल्ड : २० षटकांत ९ बाद ७८ (विश्वनाथ मुंढे १७, लक्ष्मण कावळे १२, अमोल अंगडी व प्रितीश कुलकर्णी प्रत्येकी १० धावा, रिषब शर्मा व शंताप्पा जलपुर २ बळी, अभिषेक सिंग व सौरभ भंडारी १ बळी) पराभूत विरुद्ध परेल वर्कशॉप मुंबई ः ११.३ षटकांत २ बाद ७९ (यश चव्हाण नाबाद ३६, निशांत शिवलकर २४, रोशन परते नाबाद १४, अमोल लहासे व रोहित देशमुख प्रत्येकी १ बळी).
२) मारिया क्रिकेट क्लब : १९ षटकांत सर्वबाद ९९ (एस राजापंडी ३८, नील दथिया १५, देवा ठाकूर १४, शीतल कुमार ५ बळी, सईद जहागीरदार २, जावेद अहमद व जकवान हबीब १ बळी) पराभूत विरुद्ध केबीएनसीए : ८.१ षटकांत बिनबाद ७१ (समीर शेख नाबाद ३९, मिर्झा वसीम बेग नाबाद ३०).
काशीद व मनुरे यांची एमपीएलसाठी निवड
येथील बाळकृष्ण काशीद आणि आदर्श मनुरे यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रमीयर लीग स्पर्धेसाठी ईगल नाशिक टायटन्स या टीमने ऑक्शनमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले. त्याबद्दल दोघांचा मध्य रेल्वे इन्स्टिटयूट कमिटीकडून सत्कार करण्यात आला.