
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन; जैन इरिगेशनतर्फे ‘वेटिंग फॉर व्हिसा’ पुस्तकाचे वाटप
जळगाव ः ज्या वसतिगृहात आपण शिकत आहात त्या वसतिगृहाची ओळख ही आपल्या राबवलेल्या उपक्रमातून सांस्कृतिक शैक्षणिक केंद्र बनले पाहिजे. न्याय हक्क यासाठी आंदोलन राबवले पाहिजेच परंतु मिळत असलेल्या गोष्टीतून आपली सामाजिक, राजकीय, आर्थिक उन्नती केली पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणी जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त ‘जिल्हाधिकारी आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘वेटिंग फॉर व्हिसा’ या डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित प्रा संदीप केदार अनुवादित इंदाई प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ५०० पुस्तकाचे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. यांच्या सौजन्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, जैन इरिगेशनचे मिडिया विभागाचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, जिल्हा कृषि अधीक्षक कुर्बान तडवी, प्रशांत माहुरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, प्रा संदीप केदार, द इंडियन एक्स्प्रेसचे अनिल सोनवणे, बांभोरी गावाचे सरपंच बिऱ्हाडे तसेच गृहप्रमुख संतोष बच्चे, विजय गाडे, वासुदेव बच्चे, अंलका दाभाडे, मीनाकुमारी चौधरी हे उपस्थित होते. यावेळी इंदाई प्रकाशनचे देवेंद्र करकरे, वसंत राठोड, संतोष खोपडे, किशोर सोनवणे हेही उपस्थित होते. यावेळी प्रा संदीप केदार, जैन इरिगेशनचे अनिल जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच पुढे बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध प्रकारचे उपक्रम ज्यात तुमची पकड आहे जसे मैदानी खेळ, अभ्यास, नृत्य, व्यक्तिमत्व विकास, वकृत्त्व कौशल्य आदी गोष्टीत सहभाग घ्यावा अशी प्रेरणादायी चर्चा विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी केली
आदिवासी पेहरावासह पारंपरिक नृत्य सादर करून जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. प्रास्ताविक आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले.