
फिडे महिला ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धा ः चीनची झू जीनरची आघाडी कायम
पुणे ः महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित फिडे महिला ग्रँड प्रिक्स (ग्रां-प्री) बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या टप्प्यातील स्पर्धेत पाचव्या फेरीतील अन्य चारही बरोबरीत सुटत असताना दिवसभरातील एकमेव निकाली सामन्यात भारताच्या ग्रँड मास्टर वैशाली रमेशबाबू हिने मंगोलियाच्या मुनगुंतूल बॅट खुयाकचा पराभव करुन आजचा दिवस गाजवला.
अमनोरा द फर्न येथे सुरू असलेल्या स्पर्धेत पाचव्या फेरीच्या अन्य लढतींमध्ये कोनेरू हम्पी विरुद्ध हरिका द्रोणावल्ली ही दोन भारतीयांमधील लढत बरोबरीत सुटली. तर, आता पर्यंत चमकदार कामगिरी करणाऱ्या दिव्या देशमुखला चांगल्या सुरुवाती नंतर पोलिना शुव्हालोवाविरुद्ध बरोबरीत समाधान मानावे लागले.

पोलंडच्या एलिना कॅशलीनस्काया विरुद्ध जॉर्जियाच्या मेलिया सॅलोम, बल्गेरियाच्या सालिनोव्हा न्यूरघ्युन विरुद्ध चीनच्या झू जीनर यांच्यातील सामने ही बरोबरीत सुटले.
पाचव्या फेरीअखेर चीनची झू जीनर ४ गुणांसह आघाडीवर आहे. कोनेरू हम्पी व दिव्या देशमुख प्रत्येकी ३.५ गुणांसह दुसऱ्या स्थानी असून हरिका द्रोणावल्ली, पोलिना शुव्हालोवा, वैशाली रमेशबाबू या तीन खेळाडू प्रत्येकी २.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
आजच्या एकमेव निर्णायक लढतीत वैशाली हिने मुनगुंतूल विरुद्ध किंग्ज इंडियन पद्धतीने आक्रमण करून मुनगुंतूलच्या राजाच्या बाजूची प्यादी मारण्याचा सपाटा लावला. मुनगुंतूलने तिला प्रत्युत्तर देत वजिरांची मारामारी केली. त्यानंतर झालेल्या लढाईत दोघींच्याही घोडे, उंट आणि हत्ती यांच्यात लढत रंगली. मात्र,४०व्या चालीला मुनगुंतूलने घोडा हलवताना केलेली चूक अचूक हेरताना वैशालीने वेगवान चाली केल्या व ५२व्या चालीला विजयाची पूर्तता केली.
विजयानंतर वैशाली म्हणाली की, ४०व्या चालीत तिने केलेल्या चुकीमुळे मला विजयाची चाहूल लागली होती. त्यानंतर मी कोणतीही गफलत होऊ न देता विजयाची संधी साधली. आम्ही सध्या रोज अत्यंत चुरशीच्या लढती खेळत असल्यामुळे विश्रांतीचा दिवस खूपच महत्त्वाचा ठरेल.
चौथ्या पटावरील भारताची अव्वल महिला खेळाडू कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्ली यांच्यातील बहुप्रतीक्षित लढत झटपट चाली नंतर केवळ १९ चालींमध्ये बरोबरीत सुटली. हम्पीने इंग्लिश ओपनिंगने डावाची सुरुवात केली, तेव्हाच तिचा सावध पवित्रा स्पष्ट झाला होता. दोघीनीं कोणताही धोका पत्करला नाही. महिलांच्या फिडे ग्रांपी स्पर्धा मालिकेतील यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मॉनेको येथे झालेल्या स्पर्धेतील सामन्यात हम्पीने पहिल्या फेरीत हरिकाचा पराभव केला होता. विशेष म्हणजे दोघींमधील लढती सलग आठ बरोबरीत सुटल्यानंतर ही लढत निकाली ठरणार होती. त्यामुळे हरिका हिने आज कोणताच धोका पत्करला नाही. हम्पी म्हणाली की, डावाच्या प्रारंभ नंतर दोघींची पटावरील स्थिती सारखीच मजबूत होती. त्यामुळे विजयासाठी विनाकारण प्रयत्न करणे योग्य ठरले नसते.
दुसऱ्या पटावर बल्गेरियाच्या सालिनोव्हा न्यूरघ्युन विरुद्ध चीनच्या झू जीनर हिने इंडियन डिफेन्स पद्धतीने डावपेचांनी सुरुवात केली, सालिनोव्हाने तिला तोडीस तोड उत्तर दिले. त्यामुळे पहिल्या वेळ मर्यादा अखेर पटावरील स्थिती बरोबरीत राहिली. ४४व्या चालीला जीनर हिने घोडा चुकीच्या पद्धतीने हलवला. सालिनोव्हा हिने वजीरेच्या बदल्यात घोडा व उंटाचा बळी घेत सामन्यावर पकड घेतली. तरीही जीनर हिने कडवी झुंज देत ७१व्या चाली अखेर सामना बरोबरीत सोडविला. विजय जवळ आला असतानाही पराभव येण्याची घटना कधीतरी घडते असे सालिनोव्हा हिने सामन्यानंतर सांगितले.