महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सोलापूर पुष्प संघाचा समावेश 

  • By admin
  • April 19, 2025
  • 0
  • 215 Views
Spread the love

तेजल हसबनीस, मुक्ता मगरे, श्वेता माने, गौतमी नाईक, ईशा पाठारे, भाविका अहिरे यांच्यासाठी सर्वाधिक बोली 

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुमन महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत यंदाच्या हंगामात सोलापूर पुष्प आणि पुणे वॉरियर्स या नव्या संघांचा समावेश असणार आहे. सोलापूर पुष्प या नव्या संघाने तेजल हसबनीस हिच्यावर ४ लाख ४० हजार रुपयांची बोली लावून तिला संघात घेतले. तेजल ही या स्पर्धेतील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. 

पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. यावर्षी महिलांच्या या स्पर्धेत सोलापूरच्या पुष्प संघासमवेत पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स आणि रायगड रॉयल्स या ४ संघांचा समावेश असून एकूण २२० महिला खेळाडूंची लिलाव प्रक्रिया झाली. 

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महिला खेळाडूंसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म, मंच दिला असून यात पुरुषांच्या एमपीएल स्पर्धेतील दोन वेळचा विजेता संघ रत्नागिरी जेट्स सोबत रायगड रॉयल्स या दोन संघासमवेत नव्याने सोलापूरचा पुष्प आणि पुणे वॉरियर्स संघ या स्पर्धेत असणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून जवळपास २२० महिला खेळाडूंची नावे यादीत होती. यात वरिष्ठ गटाच्या महिला खेळाडू स्मृती मानधना सोबत भारतीय संघातील खेळाडू तेजल हसबनीस, अनुजा पाटील यांचा सहभाग होता. तसेच १७,१९, २३ वर्षांखालील मुलींचा समावेश होता.


प्रारंभी अ श्रेणीतील खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. त्यात सोलापूरच्या पुष्प संघाने लिलाव प्रक्रियेतील सगळ्यात मोठी बोली ४ लाख ४० हजार रुपयांची तेजल हसबनीससाठी लावली आणि तिला संघात घेतले. तत्पूर्वी, मुक्ता मगरे हिला देखील ४ लाख रुपयांमध्ये सोलापूर संघाने घेतले. आयकॉन खेळाडू म्हणून ईश्वरी अवसारे ही संघात असणार आहे.

लिलाव प्रक्रियेमध्ये प्रत्येक संघासाठी २० लाखांची मर्यादा ठेवण्यात आली होती. त्यात कमीत कमी १६ खेळाडू घेणे आवश्यक होते. त्यासाठी अ श्रेणीतील खेळाडूंसाठी ६० हजार नंतर ब व क श्रेणीतील खेळाडूंसाठी ४० हजार व २० हजार अशी प्राथमिक बोली ठरविण्यात आली होती. त्यातून सोलापूरच्या पुष्प संघाने २० लाखांत २० खेळाडू घेतले असून सोलापूरच्या साक्षी वाघमोडे हिचा समावेश संघात आहे. सोलापूरच्या पुष्प संघासाठी मेंटॉर म्हणून माजी रणजी खेळाडू व रणजी निवड समिती सदस्य रोहित जाधव यांच्या समवेत मुख्य प्रशिक्षक इंद्रजीत कामठेकर, माजी खेळाडू राजेश माहूरकर, क्वालिटी एंटरप्रायजेसचे भरत तेलंग, किर्ती धनवानी, मनिषा कोल्हटकर, अविनाश शिंदे, सुनील यादव, मिलिंद गोरे यांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेत हवे असलेले खेळाडू संघात घेतले.

पुणे वॉरियर्स संघाने २० लाखांमध्ये २३ खेळाडू घेताना श्वेता माने हिच्यासाठी ४ लाख २० हजार रुपये खर्च केले. रत्नागिरी जेट्स संघाने १९ लाख ८० हजारात २४ खेळाडू घेताना ३ लाख ६० हजार रुपये गौतमी नाईक हिला खरेदी करण्यासाठी वापरले. रायगड रॉयल्स संघाने १९ लाख ९० हजार रुपये खर्च करून १८ खेळाडू घेतले. त्यात ईशा पाठारे आणि भाविका अहिरे यांच्यासाठी प्रत्येकी ३ लाख ८० हजार खर्च केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *