
युनिव्हर्सल वन-डे लीग क्रिकेट ः समर्थ तोताला, विकास कल्याणकरची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या युनिव्हर्सल अंडर १६ एकदिवसीय लीग क्रिकेट स्पर्धेत सीके क्रिकेट अकादमी संघाने एमजीएम क्रिकेट अकादमी संघाचा तब्बल १५५ धावांनी पराभव केला. या सामनन्यात अष्टपैलू कामगिरी नोंदवत समर्थ तोताला याने सामनावीर पुरस्कार पटकावला.

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक आणि प्रशिक्षक राहुल पाटील यांनी अंडर १६ खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची दर्जेदार संधी मिळावी या उद्देशाने युनिव्हर्सल क्रिकेट मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सीके क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ४८.४ षटकात सर्वबाद २६० अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना एमजीएम क्रिकेट अकादमी संघ २६.३ षटकात केवळ १०५ धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे सीके अकादमी संघाने १५५ धावांनी दणदणीत विजय साकारत आगेकूच केली.

या सामन्यात किरतराज सिंग याने ७८ चेंडूत ७४ धावांची जलद अर्धशतकी खेळी केली. त्याने आक्रमक फलंदाजी करताना नऊ चौकार व एक षटकार मारला. समर्थ तोताला याने ७३ चेंडूंत ५१ धावा फटकावल्या. समर्थ याने वेगवान खेळी करताना ८ चौकार मारले. स्पर्श पाटणी याने ३० चेंडूत २९ धावांचे योगदान दिले. त्याने पाच चौकार मारले. गोलंदाजीत समर्थ तोतला याने अवघ्या पाच धावांमध्ये तीन विकेट घेऊन सामना गाजवला. अष्टपैलू कामगिरीमुळे समर्थ याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनिल जाधव याने ३७ धावांत तीन गडी बाद केले. उदय इरतकर याने ४३ धावांत तीन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः सीके क्रिकेट अकादमी ः ४८.४ षटकात सर्वबाद २६० (स्पर्श पाटणी २९, लाव्या गोयल ७, समर्थ तोताला ५१, किरतराज सिंग ७४, कौशल बोदाडे १५, ऋतुराज काळे २२, हर्षित छाजेड १७, इतर ४१, अनिल जाधव ३-३७, उदय इरतकर ३-४३, विकास कल्याणकर २-३१, समर्थ पुरी २-१९) विजयी विरुद्ध एमजीएम क्रिकेट अकादमी ः २६.३ षटकात सर्वबाद १०५ (समर्थ पुरी २०, वेदांत काटकर १४, ओंकार कर्डिले ७, विकास कल्याणकर २६, इतर २७, समर्थ तोतला ३-५, करक भारद्वाज २-१३, हर्षित छाजेड २-१२, इशांक कलवणे १-१५, ऋतुराज काळे २-२०). सामनावीर ः समर्थ तोताला.