
अहमदाबाद ः जोस बटलरच्या वादळी नाबाद ९७ धावांच्या खेळीच्या बळावर गुजरात टायटन्स संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा सात विकेट राखून पराभव केला. गुजरात संघाने पाचवा विजय साकारत गुण तालिकेत आपली स्थिती भक्कम केली आहे. बटलर-रदरफोर्डची शतकी भागीदारी निर्णायक ठरली.
गुजरात टायटन्स संघासमोर विजयासाठी २०४ धावांचे आव्हान होते. कर्णधार शुभमन गिल (७) धावबाद झाला. करुण नायर याने गिलला तंबूत पाठवले. डावाच्या दुसऱ्या षटकात गुजरातला हा धक्का बसला. त्यानंतर साई सुदर्शन व जोस बटलर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी करुन डाव सावरला. साई सुदर्शन २१ चेंडूत ३६ धावा काढून बाद झाला. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला.
बटलर व रदरफोर्ड या जोडीने धमाकेदार फलंदाजी केली. खास करुन बटलर याने स्फोटक फलंदाजी केली. बटलर याने स्टार्कच्या एकाच षटकात पाच चौकार ठोकून सामन्याचे चित्र बदलून टाकले. या जोडीने तुफानी शतकी (११९) भागीदारी करुन संघाचा विजय निश्चित केला. रुदरफोर्ड याने ४३ धावांचे योगदान दिले. त्याने तीन टोलेजंग षटकार व एक चौकार मारला. जोस बटलर याने बहारदार फलंदाजी करून प्रेक्षकांची मने जिंकली. बटलर याने ५४ चेंडूत नाबाद ९७ धावा फटकावल्या. दुर्देवाने त्याचे शतक होऊ शकले नाही. राहुल तेवतिया याने षटकार व चौकार ठोकत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे बटलरला शतक ठोकण्याची संधी मिळू शकली नाही. बटलरने ११ चौकार व ४ षटकार मारले. राहुल तेवतिया याने ३ चेंडूत नाबाद ११ धावा काढल्या. गुजरात संघाने १९.२ षटकात तीन बाद २०४ धावा फटकावत सात विकेटने सामना जिंकला. मुकेश कुमार (१-४०), कुलदीप यादव (१-३०) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दिल्ली कॅपिटल्सची धमाकेदार फलंदाजी
दिल्ली कॅपिटल्स संघाने गुजरात टायटन्स संघाच्या घरच्या मैदानावर खेळताना धमाकेदार फलंदाजी करत २० षटकांत आठ गडी गमावून २०३ धावा केल्या. दिल्लीने सामन्यासाठी जॅक फ्रेझर मॅकगर्कचा समावेश केला नाही आणि करुण नायर अभिषेक पोरेलसह डावाची सुरुवात करण्यासाठी आला. अभिषेकने संघाला चांगली सुरुवात दिली, पण अर्शद खानने पोरेल याला बाद केले. नऊ चेंडूत १८ धावा काढून पोरेल पॅव्हेलियनमध्ये परतला.
दिल्लीकडून कर्णधार अक्षर पटेलने सर्वाधिक ३९ धावा केल्या. तथापि, शेवटी, आशुतोष शर्माने १९ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या, ज्यामुळे संघ २०० धावांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने शानदार गोलंदाजी केली आणि चार षटकांत ४१ धावा देत चार विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध सध्या पर्पल कॅप शर्यतीत आघाडीवर आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, दिल्ली संघाने पोरेल आणि केएल राहुलचे बळी लवकर गमावले. केएल राहुल १० वर्षांनी आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला पण २८ धावा करून बाद झाला.
त्यानंतर, करुण नायरही १८ चेंडूत ३१ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार अक्षर पटेल याने ट्रिस्टन स्टब्स सोबत चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सिराजने स्टब्सला बाद करून ही भागीदारी मोडली. २१ चेंडूत ३१ धावा काढून स्टब्स पॅव्हेलियनमध्ये परतला. मिचेल स्टार्क दोन आणि कुलदीप यादव चार धावांवर नाबाद राहिले.