
मंगलदीप टायटन्स संघावर ९ धावांनी रोमहर्षक विजय; ज्ञानदा निकम सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर महिला प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत आरएसआय क्वीन्स संघाने रोमहर्षक विजय साकारत विजेतेपद पटकावले. अतिशय प्रेक्षणीय झालेल्या अंतिम सामन्यात आरएसआय क्वीन्स संघाने मंगलदीप टायटन्स संघावर नऊ धावांनी विजय मिळवला. ज्ञानदा निकम हिने सामनावीर पुरस्कार संपादन केला. ईश्वरी सावकर हिने मालिकावीर पुरस्कार मिळवला.

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एडीसीए मैदानावर ही स्पर्धा घेण्यात आली. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात आरएसआय क्वीन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात शानदार फलंदाजी करत पाच बाद १६५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात मंगलदीप टायटन्स संघाने २० षटकात सात बाद १५६ धावा काढल्या. रोमांचक सामन्यात मंगलदीप संघाला अवघ्या नऊ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

या सामन्यात मंगलदीप टायटन्सच्या तेजस्विनी बटवाल हिने ४४ चेंडूत ७४ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत तिने १२ चौकार मारले. आरएसआय क्वीन्स संघाच्या ईश्वरी सावकर हिने ४० चेंडूत ५१ धावांची जलद अर्धशतकी खेळी केली. ईश्वरीने सात चौकार मारले. मंगलदीप टायटन्स संघाच्या मुक्ता मगरे हिने ४८ चेंडूत ५० धावांची आक्रमक खेळी केली. मुक्ताने आपल्या धमाकेदार अर्धशतकात चार चौकार मारले.
गोलंदाजीत ज्ञानदा निकम हिने प्रभावी मारा करत तीन षटकांत १७ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट घेत सामना गाजवला. श्रुती गिते हिने १७ धावांत एक गडी बाद केला. मुक्ता मगरे हिने २६ धावांत एक बळी घेऊन अष्टपैलू कामगिरी बजावली.
पारितोषिक वितरण सोहळा
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमपीएल स्पर्धेचे चेअरमन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे आणि लाइफकेअर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ विक्रांत भाले यांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांना आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी नियोजन समितीतील अजय भवलकर, अमित भोसेकर, किशोर निकम, दीपक पाटील, कांचन फाजगे, इब्राहिम शेख, प्रियांका गारखेडे आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू
सामनावीर ः ज्ञानदा निकम
मालिकावीर ः ईश्वरी सावकर
गोलंदाज ः मीना गुरवे
फलंदाज ः अनुश्री स्वामी
विकेटकीपर ः जिया सिंग
क्षेत्ररक्षक ः शाल्मली क्षत्रिय
संक्षिप्त धावफलक ः आरएसआय क्वीन्स ः २० षटकात पाच बाद १६५ (जिया सिंग १५, ईश्वरी सावकर ५१, ज्ञानदा निकम ३४, पायल पवार ४५, निकिता मोरे नाबाद ८, संजना वाघमोडे नाबाद ३, मुक्ता मगरे १-२६, अनुश्री स्वामी १-३२, साक्षी वाघमोडे १-१४) विजयी विरुद्ध मंगलदीप टायटन्स ः २० षटकात सात बाद १५६ (तेजस्विनी बटवाल ७४, मुक्ता मगरे ५०, तेजश्री ननावरे १४, ज्ञानदा निकम ३-१७, संजना वाघमोडे १-२८, श्रुती गिते १-१७, लक्ष्मी यादव १-२८). सामनावीर ः ज्ञानदा निकम. फायटर ऑफ द मॅच ः तेजस्विनी बटवाल.