
२६, २७ एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलिस अकादमी मैदानावर आयोजन
नाशिक ः नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनतर्फे येत्या २६ व २७ एप्रिल रोजी तिसऱया राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सहा ते अठरा वयोगट आणि ओपन गट अशा वयोगटात घेण्यात येणार आहे. युवा खेळाडूंना भक्कम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी ही स्पर्धा आहे असे नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ मुस्तफा टोपीवाला यांनी सांगितले.
येत्या २६ व २७ एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक येथील मैदानावर नाशिक ॲथलेटिक्स फाऊंडेशन आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा घेण्यात येणार आहे. वय वर्षे ६ ते १८ आणि खुला गट या वयोगटासाठी होणाऱया या स्पर्धेत खेळाडूंनी नोंदणी केली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातून स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन विकासाला चालना देण्यासाठी व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेमध्ये जम्पिंग, थ्रोईंग, रनिंग या क्रीडा प्रकाराचा समावेश केलेला आहे, एनएएफचे उपाध्यक्ष हिरालाल लोथे यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली.
यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू सुप्रिया तेवितिया यांनी सहभागी खेळाडूंना मार्गदर्शन करत स्पर्धेत प्राविण्य मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या सुरुवातीच्या काळात उपलब्ध सुविधा नसतांनाही माझी कारकीर्द मी गाजवलेली असून त्याविषयी एक प्रेरणा म्हणून आपले मनोगत देखील व्यक्त केले. आता आधुनिक काळात महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे सिंथेटिक ट्रॅक तसेच अनेक सेवा सुविधा सर्वच स्पर्धकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.
न्यू ग्रेस अकादमीचे चेअरमन राजेंद्र वानखेडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून एन ए एफ कमिटी पदाधिकारी यांनी अशा या स्पर्धेचे आयोजन केले म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेऊन वेगवेगळ्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, उपस्थित पत्रकारांना संबोधित करताना म्हटले की आधुनिक काळात सामाजिक माध्यमे हेच प्रसार माध्यमे म्हणून एक प्रभावी माध्यम बनले आहे, सामान्य नागरिक यांचेपर्यंत सर्व प्रकारची माहिती पोहोचण्याचे काम वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम, पत्रकार करीत असतात. सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचे चेअरमन प्रसाद मुखेकर यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
या पत्रकार परिषदेस उपस्थित प्रमुख अतिथी राजेंद्र वानखेडे, आंतरराष्ट्रीय धावपटू सुप्रिया तेवितीया यांचे स्वागत एनएएफ उपाध्यक्ष हिरालाल लोथे, सचिव मंगेश राऊत आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या करण्यात आले. तसेच यावेळी स्पर्धेमध्ये सहभागी, विजयी, उत्कृष्ट खेळाडूंना देण्यात येणारे मेडल्स, ट्रॉफी, प्रमाणपत्र, बक्षिस, टी-शर्ट, सायकल यांचे प्रातिनिधिक स्वरूपात अनावरण करण्यात आले.
नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशनचे सचिव मंगेश राऊत हे स्वतः एक खेळाडू असून त्यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी आपला अनुभव पणाला लावला आहे. त्यांनी अनेक खेळाडूंना वैयक्तिक मार्गदर्शन करुन घडवण्याचे काम सुरू आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याचे स्वप्न आहे. या पत्रकार परिषदेत मंगेश राऊत यांनी आपल्या स्वप्नाचा उलगडा केला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एनएएफ पदाधिकारी-सदस्य डॉ मुस्तफा टोपीवाला, हिरालाल लोथे, मंगेश राऊत, नलिनी कड, मनोहर भावनाथ, राजेंद्र शिंदे, शैला घुले, राहुल पिंगळे, दत्ता शिंदे, गौरव लोणारे, दीपाली निकम, अमित जैन, पराग देशमुख आदी परिश्रम घेत आहेत. तसेच पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, राजकीय-सामाजिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांचे देखील मोलाचे योगदान मिळत आहे. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक सचिव मंगेश राऊत यांनी केले. मनोहर भवनाथ यांनी आभार मानले.