
१४ धावांत सहा विकेट घेणारी गायत्री सुरवसे सामनावीर
सोलापूर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए १९ वर्षांखालील महिला निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पुणे महिला संघाने विजेतेपद पटकावले तर सोलापूर महिला संघ उपविजेता ठरला.
पुणे येथील गहुंजे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात सोलापूर महिला संघाला पुणे महिला संघाने तब्बल १०० धावांनी पराभूत केले. सोलापूर महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुणे महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात सर्वबाद १६६ धावा केल्या. त्यात प्रांजली पिसे हिने सर्वाधिक ४६ धावा काढल्या. तिला सृष्टी भांगे (३३) व तृष्णा नहर (१४) यांनी उत्कृष्ट फलंदाजी करुन सुरेख साथ दिली. गोलंदाजीत सोलापूर संघाकडून साक्षी लामकाने हिने २९ धावांत ४ बळी टिपले. भक्ती पवार हिने ३ तर विभावरी देवकते व प्रतिक्षा नंदर्गी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
सोलापूर महिला संघाला विजयासाठी १६७ धावांची गरज होती. मात्र, या धावसंख्येचा पाठलाग करताना सोलापूर महिला संघ २६.४ षटकात अवघ्या ६६ धावांत सर्वबाद झाला. पुण्याच्या गायत्री सुरवसेच्या (६-१४) भेदक गोलंदाजीमुळे सोलापूरचा डाव गडगडला. शिवांशी कपूर हिने २ तर आमनी नंदाल हिने १ गडी बाद केला गौरी पाटील (२९ धावा) वगळात सोलापूरच्या अन्य खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पुणे महिला संघाने हा सामना १०० धावांनी जिंकला. गायत्री सुरवसे ही सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.