विराट कोहलीने मोडला वॉर्नरचा सर्वकालीन विक्रम

  • By admin
  • April 21, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

बंगळुरू ः रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर याचा सर्वकालीन विक्रम मोडला आहे. आयपीएल २०२५ च्या ३७ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला. या सामन्यात विराट कोहली ७३ धावांवर नाबाद राहिला आणि आयपीएलमधील त्याचा ६७ वा ५० प्लस स्कोअर बनवला.

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत सहा विकेट गमावून १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबी संघाने १८.५ षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह, आरसीबी संघ १० गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच वेळी, पंजाब संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे.

या शानदार खेळीसह विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५० प्लस धावा करणारा फलंदाज बनला आहे. कोहलीने या बाबतीत डेव्हिड वॉर्नरला मागे टाकले आहे. वॉर्नर याने आयपीएलमध्ये ६६ वेळा ५० प्लस धावा केल्या होत्या. कोहलीने आयपीएलमध्ये ५९ अर्धशतके आणि आठ शतके झळकावली आहेत. तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहलीने २६० सामन्यांमध्ये ८३२१ धावा केल्या आहेत. २००८ मध्ये स्थापन झाल्यापासून कोहली या लीगचा भाग आहे आणि गेल्या १८ हंगामांपासून आरसीबीकडून खेळत आहे.

या हंगामात कोहली उत्तम फॉर्ममध्ये

कोहलीने आठ सामन्यांमध्ये १४० च्या स्ट्राईक रेटने आणि ६४.४० च्या सरासरीने ३२२ धावा केल्या आहेत. या हंगामात लक्ष्यांचा पाठलाग करताना कोहलीने तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध नाबाद ५९, राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाबाद ६२ आणि पंजाबविरुद्ध नाबाद ७३ धावा केल्या. पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या पाच डावांबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ५९, ७७, ९२, १ आणि ७३ नाबाद धावा केल्या आहेत.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत
या हंगामात कोहली त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहे. तो सध्या या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीच्या पुढे लखनौ सुपर जायंट्सचा निकोलस पूरन (३६८ धावा) आणि गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन (३६५ धावा) आहेत. ३१५ धावांसह जोस बटलर आणि ३०७ धावांसह यशस्वी जयस्वाल अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक ५० प्लस धावा

विराट कोहली – ६७
डेव्हिड वॉर्नर – ६६
शिखर धवन – ५३
रोहित शर्मा – ४६
केएल राहुल – ४३
एबी डिव्हिलियर्स – ४३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *