
कबड्डी स्पर्धा
मुंबई ः विजय क्लब, अमर क्रीडा, एसएसजी, शिवमुद्रा प्रतिष्ठान या संघांनी जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक १९३ पुरस्कृत अनंतशेठ नागवेकर चषक कुमार गट कबड्डी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जुनी प्रभादेवी येथील शीला खाटपे मॅटच्या क्रीडांगणावर झालेल्या पहिल्या सामन्यात दादरच्या विजय क्लबने एन एम जोशी मार्गच्या जय भारत मंडळाचा सहज पाडाव करीत आगेकूच केली. मनीष वसकर, आयुष करपे यांच्या तुफानी चढाया, तर रोहन तिवारी याचा भक्कम बचाव या विजयात महत्वाचा ठरला. जय भारतच्या निरंजन साळुंखे, साहिल डांगरे यांचा प्रतिकार अगदीच दुबळा ठरला.
दुसऱ्या अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या सामन्यात काळाचौकीच्या अमर मंडळाने जय दत्तगुरूचा प्रतिकार ३८-३५ असा संपुष्टात आणला. आक्रमक सुरुवात करीत ३ऱ्या मिनिटाला पहिला लोण देत अमरने ९-० अशी आघाडी घेतली. आदित्य घोडेराव याने चढाईत गुण घेत दत्तगुरू संघाचे खाते खोलले. १०व्या मिनिटाला दत्तगुरूने लोणची परतफेड करीत १०-१४ अशी आघाडी कमी केली. पूर्वार्धात २०-१५ अशी अमर कडे आघाडी होती. उत्तरार्धात १३व्या मिनिटाला शिलकी गड्याची पकड करीत लोण देत दत्तगुरूने २९-२६ अशी आघाडी घेतली. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा ३२-२८ अशी दत्तगुरुकडे आघाडी होती. दीपक पवारने एका चढाईत ३ गडी टिपत अमरला ३४-३३ अशी आघाडी मिळवून दिली. शेवटची २ मिनिटे असताना लोण देत अमरने ३८-३३ अशी आघाडी घेतली. पवारला चढाई करण्यासाठी रमेश रायकर याची, तर पकडीमध्ये निहाल पेडणेकर याची उत्तम साथ लाभली. दत्तगुरच्या आदित्य घोडेराव, नयन मोहिते यांनी शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली.
एसएसजी फाऊंडेशनने वारसलेन संघाचा दुबळा प्रतिकार मोडून काढला. हर्ष शिगवण, अनुराग जुवाठकर, संस्कार गांगे यांच्या चढाई व पकडीच्या झंझावाती खेळाने एसएसजी संघाने या विजयाची किमया साधली. वारसलेन संघाचा निलेश परब चमकला. शेवटच्या सामन्यात शिवमुद्रा प्रतिष्ठान संघाने विशाल लाड, अथर्व हाटकर यांच्या चतुरस्त्र खेळाने दुर्गामाता स्पोर्ट्सचा ३१-१४ असा लिलया पाडाव केला. दुर्गामाता संघाचा तनिष चव्हाण याने झुंज दिली.