श्री मावळी मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ

  • By admin
  • April 21, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

ठाणे ः श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त व १०० व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७२ व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाची कबड्डी स्पर्धा २५ ते २९ एप्रिल या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून गोपाळ लांडगे (कल्याण जिल्हाप्रमुख), अशोक वैती (माजी महापौर), देवराम भोईर (माजी विरोधी पक्षनेते) हे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार डॉ संजय नाईक हे उपस्थित राहणार आहेत.

यंदा संस्था शताब्दी वर्ष साजरे करीत असल्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात १०० संघांना प्रवेश देण्यात आला आहे. स्पर्धेत पुरुष गटात ६८ संघानी व महिला गटात ३२ संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेतील सामने बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी पुरुषांची ४ आणि महिलांची २ क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. कबड्डी प्रेमींना सामन्यांचा आनंद घेता यावा म्हणून खास प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्व सामने सायंकाळच्या सत्रात होणार आहेत. संस्थेच्या शतक महोत्सवीवर्षानिमित्त छत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, दादोजी पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त मिळालेल्यांचा खास सत्कार करण्यात येणार आहे.

हयास्पर्धेत पुणे, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर या जिल्ह्यातील नामवंत संघांचा सहभाग आहे. गतवर्षी पुरुष गटात स्वस्तिक क्रीडा मंडळाने शिव शंकर क्रीडा मंडळाचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते. व महिला गटात अंतिम सामन्यात शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा पराभव केला होता.

या स्पर्धेत पुरुष गटात गतविजेते स्वस्तिक क्रीडा मंडळा (मुंबई उपनगर), सतेज संघ बाणेर, श्री शिवाजी उदय मंडळ , बदामी हौद संघ (सर्व पुणे), बाल मित्र मंडळ (पालघर), टीआयपीएल क्लब पनवेल (रायगड), जय बजरंग क्रीडा मंडळ वाशिंद, शिव शंकर क्रीडा मंडळ कल्याण, ग्रीफिन्स जिमखाना नवी मुंबई (सर्व ठाणे), स्वस्तिक क्रीडा मंडळ, पार्ले स्पोर्ट्स क्लब, जय भवानी तरुण मंडळ (सर्व मुंबई उपनगर), बंड्या मारुती सेवा मंडळ,अंकुर स्पोर्ट्स क्लब, शिवनेरी सेवा मंडळ, अमर हिंद मंडळ, गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (सर्व मुंबई शहर) या बलाढ्य संघांचा समावेश आहे.

तसेच महिला गटात शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब (धुळे), स्वराज्य स्पोर्ट्स अकॅडमी (चिपळूण), रा फ नाईक नवी मुंबई, शिवतेज क्रीडा मंडळ, ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब (सर्व ठाणे), स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब, महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब (सर्व मुंबई उपनगर), अमर हिंद मंडळ, विश्वशांती, डॉ शिरोडकर स्पोर्ट्स क्लब (सर्व मुंबई शहर) या नामवंत संघांचा समावेश आहे.

यंदा संस्थेच्या शतक महोत्सवीवर्षानिमित्त स्पर्धेच्या पारितोषिकांमध्ये भरघोस वाढ केली आहे. या स्पर्धेत एकूण ५ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत पुरुष गटात विजेत्या संघाला १ लाख रुपये, उपविजेत्या संघाला ७५ हजार रुपये व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला २५ हजार रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच महिला गटात विजेत्या संघाला ५५ हजार रुपये, उपविजेत्या संघाला ४४ हजार रुपये व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला २२ हजार रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, खेळाडू व कार्यकर्ते अथक मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *