शिवाजी पार्क वॉरियर्स संघाचा पोलिसांवर मोठा विजय 

  • By admin
  • April 22, 2025
  • 0
  • 71 Views
Spread the love

दहावी मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग : अथर्व अंकोलेकरची अष्टपैलू चमक

मुंबई : ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एमसीसी आयोजित १० व्या मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग स्पर्धेच्या सुपर लीग सामन्यांना मुंबई पोलिस जिमखाना, मारिन ड्राईव्ह येथे प्रारंभ झाला. सुपर लीग मधील पहिल्या लढतीत शिवाजी पार्क वॉररिअर्स संघाने गतविजेत्या मुंबई पोलिस सिटी रायडर्स संघावर सहा विकेट्स आणि १६ चेंडू राखून दणदणीत विजय मिळविला आणि प्राथमिक साखळीतील पराभवाची परतफेड केली. 

एमसीएच्या निवड चाचणीमुळे तासभर उशिरा सुरू झालेल्या लढतीत १५ षटकांची लढत खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नाणेफेक जिंकून शिवाजी पार्क वॉरियर्सने मुंबई पोलिस सिटी रायडर्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात पोलीस संघाने ५० धावांतच पहिले चार फलंदाज गमावले. नंतर रुतुराज (४०), प्रदेश लाड (३५) आणि योगेश पाटील (नाबाद १९) यांच्या उपयुक्त फलंदाजीमुळे त्यांनी १५ षटकांत ८ बाद १३० धावांची मजल मारता आली. मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज अथर्व अंकोलेकर याने २० धावांत ३ बळी मिळविले तर देव पटेल यानें ७ धावांत २ बळी मिळविले.

या आव्हानाचा पाठलाग करताना मागील दोन लढतीत शतकी खेळी करणाऱ्या सुवेद पारकर (१५) आणि  वरून लवंडे (२९) या जोडीने पहिल्या तीन षटकांतच ३६ धावांची सलामी दिली. त्यानंतर हार्दिक तामोरे (१६), अग्नी चोप्रा (३३) आणि अथर्व अंकोलेकर (नाबाद २४) यांनी धावांचा वेग कायम राखत १२.२ षटकांतच  ४ बाद १३२ धावा करीत सुपर लीग मधील पहिल्या विजयाची नोंद केली.

अडीच लाख रुपयांची रोख पारितोषिके असणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना ३० एप्रिल रोजी पोलिस जिमखाना येथेच होणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघातून मुंबईच्या रणजी संघातील आजी-माजी खेळाडूंचा भरणा असून पुढील महिन्यात होणाऱ्या मुंबई प्रीमियर लीग साठी आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी सर्व खेळाडूंसाठी ही शेवटची संधी असल्याने प्रत्येक खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक दिसत आहेत.

संक्षिप्त धावफलक ः मुंबई पोलिस सिटी रायडर्स ः १५ षटकांत ८ बाद १३० (सुनील पाटील १३, रुतुराज ४०, प्रदेश लाड ३५, योगेश पाटील नाबाद १९; अथर्व अंकोलेकर २० धावांत ३ बळी, देव पटेल ७  धावांत २ बळी) पराभूत विरुद्ध शिवाजी पार्क वॉरियर्स ः १२.२ षटकांत ४ बाद १३२ (सुवेद पारकर १५, वरून लवंडे २९, हार्दिक तामोरे १६, अग्नी चोप्रा ३३, अथर्व अंकोलेकर नाबाद २४). सामनावीर ः अथर्व अंकोलेकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *