
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुणवंत तलवारबाजी या खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू कशिश दीपक भराड हिला बालेवाडी क्रीडा संकुलात पार पडलेल्या सोहळ्यात शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते कशिषला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल तसेच तिच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल तिचा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे वतीने विभागीय क्रीडा संकुल तलवारबाजी हॉल येथे सर्व उपस्थित खेळाडू समक्ष तिचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी कशीशने मनोगत व्यक्त करताना या पुरस्कारामुळे मला अधिक जोमाने भारतासाठी भविष्यात एशियन, कॉमनवेल्थ आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी प्रेरणा मिळाली.
या प्रसंगी राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तलवारबाजी खेळाचे एकूण १० शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू व १ मार्गदर्शक पुरस्कार छत्रपती संभाजीनगर तलवारबाजी संघटनेने घडविले आहेत व पुढे देखील अशीच परंपरा चालू राहील व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तलवारबाजीचा ऑलिम्पिक खेळाडू घडेल अशी आशा व्यक्त केली आहे. या प्रसंगी जिल्हा तलवारबाजी संघटनेचे डॉ दिनेश वंजारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक तुषार आहेर , पालक दीपक भराड, अंजली भराड, स्वप्ना डोंगरे व तलवारबाजीचे खेळाडू आदींची उपस्थिती होती.