दिल्ली कॅपिटल्सचा लखनौवर आठ विकेटने विजय 

  • By admin
  • April 22, 2025
  • 0
  • 62 Views
Spread the love

मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, केएल राहुल दणदणीत विजयाचे हिरो 

लखनौ : वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (४-३३), अभिषेक पोरेल (५१) व केएल राहुल (नाबाद ५७) यांच्या प्रभावी कामगिरीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने लखनौ सुपरजायंट्स संघाचा आठ विकेट राखून पराभव केला. सहाव्या विजयासह दिल्ली संघाने गुणतालिकेत १२ गुणांसह आपली स्थिती भक्कम केली आहे. आयपीएल इतिहासात ५ हजार धावा सर्वात कमी कालावधीत पूर्ण करणारा राहुल हा पहिला फलंदाजा ठरल आहे. 

दिल्ली कॅपिटल्स संघासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अभिषेक पोरेल व करुण नायर या सलामी जोडीने डावाची सुरुवात आक्रमक करत ३६ धावांची भागीदारी केली. मार्करम याने करुण नायरची ९ चेंडूतील १५ धावांची आक्रमक खेळी संपुष्टात आणली. नायरने दोन चौकार व एक षटकार मारला. चौथ्या षटकात दिल्लीला पहिला धक्का बसला. 

नायर बाद झाल्यानंतर पोरेल व केएल राहुल या जोडीने ६९ धावांची दमदार भागीदारी करुन संघाचा विजय सुकर बनवला. १२व्या षटकात पोरेलची स्फोटक अर्धशतकी खेळी संपुष्टात आली. पोरेल याने बहारदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या ३६ चेंडूत ५१ धावा फटकावल्या. अर्धशतक ठोकताना पोरेलने पाच चौकार व एक षटकार मारला. अर्धशतक साजरे झाल्यानंतर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात ५१ धावांवर बाद झाला. मिलर याने त्याचा सोपा झेल घेतला. मार्करम याने सामन्यातील आपला दुसरा बळी मिळवला. 

केएल राहुल व कर्णधार अक्षर पटेल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ५६ धावांची भागीदारी करत संघाला ८ विकेट राखून विजय मिळवून दिला. १७.५ षटकात दिल्लीने दोन बाद १६१ धावा फटकावत शानदार विजयासह घोडदौड कायम ठेवली. राहुल याने ४२ चेंडूत नाबाद ५७ धावांची वेगवान खेळी साकारली. या दमदार खेळीत राहुलने तीन चौकार व तीन षटकार मारले. कर्णधार अक्षर पटेल याने केवळ २० चेंडूत नाबाद ३४ धावा फटकावल्या. त्याने चार टोलेजंग षटकार व एक चौकार मारला. मार्करम याने ३० धावांत दोन विकेट घेतल्या. 

लखनौ सहा बाद १५९, पंत पुन्हा अपयशी 

लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु एडन मार्कराम आणि मिशेल मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी शानदार भागीदारी केली. या भागीदारीच्या खंडानंतर लखनौचा डाव डळमळीत झाला आणि संघाला २० षटकांत सहा गडी बाद फक्त १५९ धावा करता आल्या. लखनौकडून मार्करमने ३३ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांसह सर्वाधिक ५२ धावा केल्या, तर मार्शने ३६ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना मार्श आणि मार्करम यांनी लखनौला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. मार्करमने ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे या हंगामात त्याचे चौथे अर्धशतक आहे. तथापि, दुष्मंथ चामीराने मार्करमला बाद करून ही भागीदारी मोडली. मार्करम बाद होताच लखनौचा डाव कोसळला आणि त्यांनी २३ धावांच्या अंतराने चार विकेट गमावल्या. मार्करम बाद झाल्यानंतर मिचेल स्टार्कने निकोलस पूरनला बाद केले, जो नऊ धावा करून बाद झाला होता.

त्यानंतर मुकेश कुमार याने दोन धावा काढणाऱ्या अब्दुल समद याला बाद केले. चांगली फलंदाजी करणारा मिचेल मार्शही मुकेश कुमारचा बळी ठरला. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या आयुष बदोनीने डेव्हिड मिलरसोबत पाचव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली पण मुकेश कुमारने बदोनीला बोल्ड केले. २१ चेंडूत सहा चौकारांसह ३६ धावा काढून बदोनी बाद झाला. मनोरंजक गोष्ट म्हणजे, लखनौचा डाव संपण्यासाठी दोन चेंडू शिल्लक असताना कर्णधार ऋषभ पंत सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.

या सामन्यात पंत फक्त दोन चेंडू खेळण्यासाठी आला असला तरी तो आपले खातेही उघडू शकला नाही आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर मुकेशने त्याला बाद केले. दिल्लीकडून मुकेश कुमारने शानदार गोलंदाजी करत चार विकेट्स घेतल्या, तर स्टार्क आणि चमेरा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात कुलदीप यादवला एकही यश मिळवता आले नाही. या हंगामात कुलदीप पहिल्यांदाच रिकाम्या हाताने खेळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *