
नागपूर ः भारतीय हॉकी पुरुषांच्या वरिष्ठ राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी परमोद याची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अकाउंटंट जनरल (ऑडिट) यांनी परमोद याचा सत्कार केला.
बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात २५ ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱया भारतीय हॉकी वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ५४ खेळाडूंमध्ये परमोद याची निवड झाली आहे. या निवडीबद्दल नवी दिल्ली नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) कार्यालयाने एका पत्राद्वारे आनंद व्यक्त केला आहे.
परमोद याने आतापर्यंत २०१७ मध्ये भोपाळ येथे राष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले आहे. २०१८ मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेत तो खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेत २०१९ मध्ये खेळताना त्याने रौप्यपदक जिंकले होते. २०१९ मध्ये चेन्नई येथे त्याने सीनियर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले. ग्वाल्हेर, झाशी, आसाम, भुवनेश्वर, नवी दिल्ली, बंगरुलू या ठिकाणी झालेल्या विविध हॉकी स्पर्धेत परमोद याने आपला ठसा उमटवला आहे. तसेच विद्यापीठ पातळीवर त्याने आपली चमक दाखवली आहे.
नागपूर येथील अकाउंटंट जनरल (ऑडिट) दत्तप्रसाद शिरसाट यांनी परमोदला त्याच्या कामगिरीबद्दल सन्मानित केले आणि त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डीएजी बी मणिमोझी, डीएजी मेघना जैन, वरिष्ठ ऑडिट ऑफिसर कल्याणचे मंगेश टोंगो, अध्यक्ष (एजीआरसी) विनीत घाडगे, सचिव (एजीआरसी) मंगेश दुडुळकर आणि अनिल दराल, एजी हॉकी संघाचे प्रशिक्षक, एजीआरसी हॉकी खेळाडू आणि एजी (ऑडिट) चे कर्मचारी उपस्थित होते, अशी माहिती डिंटिस थॉमस यांनी दिली.