
रेल्वेची ७८वी स्कॉट मेमोरियल क्रिकेट स्पर्धा ः श्रीनिवास कुलकर्णी सामनावीर
सोलापूर ः मध्य रेल्वे सोलापूर इन्स्टिट्यूटच्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन अ गटाच्या क्रिकेट स्पर्धेत भंडारी स्पोर्ट्स क्लबने युनायडेट क्रिकेट क्लबवर ७ गडी राखून मोठा विजय मिळविला. श्रीनिवास कुलकर्णी हा सामन्याचा मानकरी ठरला.
अतुल बांदीवाडीकर यांच्या हस्ते श्रीनिवास कुलकर्णी याला हा पुरस्कार देण्यात आला. प्रत्येक सामनावीर पुरस्कार सुदेश मालप व सुनील मालप यांच्याकडून देण्यात येत आहेत. पंच म्हणून दयानंद नवले व नितीन गायकवाड तर गुणलेखक म्हणून सचिन गायकवाड यांनी काम पाहिले.

येथील रेल्वे मैदानावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलात या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता खेळाडू आदित्य गिराम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यापूर्वी मानाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदित्य गिराम व त्यांचे प्रशिक्षक हरीश अन्नलदास यांचा सत्कार मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटतर्फे सेक्रेटरी किशोर पिल्ले व खजिनदार विक्रांत पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी रेल्वे इन्स्टिट्यूटचे कमिटी मेंबर नागेश नवले, रेल्वेचे वरिष्ठ खेळाडू लियाकत शेख, अंबादास तोरा, प्रवीण देशेट्टी, अनिल गिराम, सुदेश मालप, अतुल बांडीवाडीकर, अमजत पठाण आदी उपस्थित होते. प्रास्तविक सचिन गायकवाड यांनी केली.
संक्षिप्त धावफलक ः युनायटेड क्रिकेट क्लब : ३४.४ षटकांत सर्वबाद १५९ (अक्षय देशमुख ३०, प्रथम तानवडे १९, चंद्रशेखर लोखंडे १५ धावा, श्रीनिवास कुलकर्णी ३ बळी, सोमनाथ भरले व अनिल सलगर २ बळी, राजवर्धन खटके-पाटील व विघ्नेश जाधव प्रत्येकी १ बळी) पराभूत विरुद्ध भंडारी स्पोर्ट्स क्लब : २२ षटकांत ३ बाद १६२ (नागराज येनगंटी नाबाद ७०, आर्यन काळे नाबाद ३९, श्रीनिवास कुलकर्णी ३५ धावा, प्रशम चंकेश्वरा २ बळी, सचिन अचोली १ बळी).