
नवमित्र क्रीडा मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा
मुंबई ः अमर मंडळ, श्री साई क्लब, श्री संस्कृती प्रतिष्ठान, आंबेवाडी मंडळ या संघांनी वरळीच्या नवमित्र क्रीडा मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या द्वितीय श्रेणी (ब) गटाच्या कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने वरळी येथील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या स्व. यशवंत साळवी मॅटच्या क्रीडांगणावर स्व. दीपक वेर्लेकर चषकासाठी झालेल्या उद्घाटनीय सामन्यात वरळीच्या अमर मंडळाने ओम् ज्ञानदीप मंडळावर ३५-२० अशी मात केली. पूर्वार्धात चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात ८-६ अशी अमर कडे आघाडी होती. उत्तरार्धात अमरने आपला खेळ गतिमान करीत ओम् ज्ञानदीपवर २ लोण देत आपला विजय निश्चित केला. अनिकेत वारंग याच्या झंझावाती चढाया त्याला यश येळमकरची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. ओम् ज्ञानदीपचा राकेश परब चमकला.
श्री साई क्लबने चुरशीच्या लढतीत प्रेरणा मंडळाचे आव्हान ३७-३२ असे संपुष्टात आणले. विश्रांतीला २३-१६ अशी आघाडी घेणाऱ्या श्री साईला विश्रांतीनंतर विजयासाठी प्रेरणाने चांगलेच झुंजविले. शेवटी ५ गुणांनी साईने विजय मिळविला. तेजस गायकवाड, निलेश यांनी श्री साई कडून, तर रोहित गुरव, चेतन वसकर यांनी प्रेरणा कडून उत्कृष्ट खेळ केला. श्री संस्कृती प्रतिष्ठानने अष्टविनायक मंडळाचा ४०-१७ असा सहज पाडाव केला. पहिल्या सत्रात २लोण देत २४-११ अशी आघाडी घेणाऱ्या संस्कृतीने दुसऱ्या सत्रात देखील त्याच जोशात खेळत मोठ्या गुण फरकाने सामना आपल्या नावे केला. अमन राणा, मनोज गोरे यांच्या तुफानी चढाया, तर रोशन रायाचा भक्कम बचाव यामुळे हे सोपे गेले. अष्टविनायक संघाचा प्रणिल महाडिक याने झुंज दिली.
आंबेवाडी मंडळाने शेवटच्या सामन्यात ज्ञानेश्वर मंडळाला ३३-१७ असे नमविले. पूर्वार्धात २ लोण देत २३-०७ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या आंबेवाडीने उत्तरार्धात सावध खेळ करीत आपला विजय साकारला. आंबेवाडीच्या या विजयात साहिल शेलारने एका चढाईत ३ गडी टिपत मोलाचा वाटा उचलला. त्याला धनंजय निजामपूरकर याची उत्तम साथ लाभली. ज्ञानेश्वर याच्या प्रणय कनेरकर एकाकी लढला.
शिवसेनेचे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी निरंजन नलावडे, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सुशील ब्रीद, राष्ट्रीय खेळाडू विजय जावळेकर, स्पर्धा निरीक्षक महेंद्र हळदणकर, मंडळाचे अध्यक्ष जयराम मेस्त्री, सचिव विक्रम बालन, नारायण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.