जसप्रीत बुमराहचे तिहेरी शतक !

  • By admin
  • April 24, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

क्लासेनचा विकेट घेऊन जस्सीने रचला नवा इतिहास 

हैदराबाद ः दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आपल्या अचूक गोलंदाजीने पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धेत दबदबा निर्माण केला आहे. हैदराबाद सनरायझर्स संघाविरुद्ध बुमराह याने एक विकेट घेऊन एक नवा इतिहास रचला आहे. बुमराह याने ३०० विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. बुमराहचे विकेट घेण्याचे तिहेरी शतक चर्चेचा केंद्रबिंदू बनले आहे. 

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सलग चौथा विजय मिळवला आहे. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने सनरायझर्स हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर यांनी चेंडूने धुमाकूळ घातला, तर रोहितचा आणखी एक सुपरहिट शो बॅटने पाहायला मिळाला. जसप्रीत बुमराह हैदराबाद संघाविरुद्ध फॉर्ममध्ये नसला तरी, एक विकेट घेऊन त्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये इतिहास रचला आहे. हैदराबादसाठी सर्वात शानदार खेळी करणाऱ्या हेनरिक क्लासेनची विकेट बुमराहने घेतली.

बुमराहने रचला इतिहास
हैदराबाद संघाविरुद्ध जसप्रीत बुमराह त्याच्या लाईन आणि लेंथपासून दूर गेला असे दिसून आले. त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये बुमराहने ३९ धावा दिल्या आणि फक्त एक विकेट घेतली. तथापि, बुमराहने क्लासेनचा मोठा बळी घेतला, ज्याने ४४ चेंडूत ७१ धावांची शानदार खेळी केली. तथापि, क्लासेनची एकमेव विकेट घेऊन बुमराहने टी २० क्रिकेटमध्ये विकेटचे त्रिशतक पूर्ण केले आहे. हा टप्पा गाठण्यासाठी बुमराहने भारताकडून सर्वात कमी सामने खेळले आहेत.

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३०० विकेट्स घेणारा जसप्रीत तिसरा गोलंदाज आहे. ही कामगिरी करणारा तो फक्त पाचवा भारतीय गोलंदाज आहे. जागतिक क्रिकेटमध्ये ३०० बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बुमराहचा इकॉनॉमी रेट सर्वात कमी आहे. जस्सीने ६.९१ च्या इकॉनॉमीने ३०० विकेट्स घेतल्या आहेत आणि या बाबतीत त्याने लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे. विकेटचे त्रिशतक केल्यानंतर मलिंगाचा इकॉनॉमी रेट ७.०७ होता.

बुमराह दुसरा भारतीय गोलंदाज
बुमराह हा टी २० क्रिकेटमध्ये ३०० बळी घेणारा फक्त दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. बुमराहपूर्वी फक्त भुवनेश्वर कुमारलाच ही कामगिरी करता आली. बुमराह-भुवी व्यतिरिक्त युजवेंद्र चहल, पियुष चावला आणि आर अश्विन यांनी टी २० क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सने एकतर्फी सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ७ गडी राखून पराभव करून आयपीएल २०२५ च्या पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान मजबूत केले आहे. मुंबईने ९ सामन्यांत ५ वेळा विजयाची चव चाखली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *