
अॅम्बिशियस संघ सात बाद ७८, श्रीवत्स कुलकर्णी, राम राठोड, जय हारदे, राघव नाईक चमकले
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १९ सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने सर्वबाद २४८ धावसंख्या उभारली आहे. त्यानंतर अॅम्बिशियस संघाने पहिल्या डावात २३.४ षटकात सात बाद ७८ धावा काढल्या आहेत. पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर संघाने सामन्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमी मैदानावर हा सामना होत आहे. छत्रपती संभाजीनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ६१.४ षटकात सर्वबाद २४८ धावा काढल्या. रुद्राक्ष बोडके (७) व जय हारदे (९) हे लवकर बाद झाले. राम राठोड व रोहित पाटील यांनी छोटीशी भागीदारी केली. रोहित पाटील चार चौकारांसह २१ धावा काढून बाद झाला.
राम राठोड व राघव नाईक यांनी शानदार फलंदाजी करत डाव सावरला. राम राठोड याने ५८ चेंडूत ६६ धावा फटकावल्या. रामने आठ चौकार व तीन उत्तुंग षटकार मारले. राघव नाईक याने ६८ चेंडूंचा सामना करत ४१ धावांची खेळी केली. त्याने पाच चौकार मारले.
रुद्र सूर्यवंशी (१५), कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी (२८), श्रीनिवास लेहेकर (१५), अभिराम गोसावी (नाबाद १२), जैद पटेल (१३), अविनाश साह (८) यांनी आपापले योगदान दिले.
अॅम्बिशियस संघाकडून ओंकार जाधव याने प्रभावी गोलंदाजी करत ७६ धावांत चार गडी बाद केले. अर्जुन साळुंके याने ३७ धावांत दोन बळी घेतले. आर्यन यादव, पृथ्वी सिंग, आदित्य कापरे, गौतम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
अॅम्बिशियस संघाने पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा २३.४ षटकात सात बाद ७८ धावा काढल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर संघाच्या प्रभावी गोलंदाजीसमोर त्यांची दाणादाण उडाली. आदित्य कापरे (०), सुमीत केंगार (०), अभिनव केंगार (०), पृथ्वी सिंग (०) या फलंदाजांना धावांचे खातेही उघडता आले नाही. ११ धावांवर त्यांचे चार फलंदाज तंबूत परतले होते.
वेदांत हांचे याने डाव सावरला. वेदांत याने ५३ चेंडूत ४५ धावा फटकावल्या. त्याने नऊ चौकार मारले. तेजस गिलबिले याने ६३ चेंडूत २५ धावा काढल्या. त्याने चार चौकार मारले.
कर्णधार श्रीवत्स कुलकर्णी याने प्रभावी गोलंदाजी करत २५ धावांत दोन विकेट घेतल्या. जैद पटेल याने १४ धावांत एक बळी घेतला. जय हारदे याने ७ धावांत दोन गडी बाद करुन सामन्यात रंगत आणली.