
सोलापूर येथे आयोजन, २० संघांचा सहभाग, विजेत्यास एक लाखाचे पारितोषिक
सोलापूर ः येथील शिंदे चौकातील शिवस्मारकच्या मैदानावर २५ ते २७ एप्रिल दरम्यान डॉ हेगडेवार करंडक पुरुष गटाची राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती येथील क्रीडा भारतीचे सचिव राजेश कळमणकर यांनी दिली.
यासंबंधी अधिक माहिती सांगताना राजेश कळमणकर म्हणाले की, क्रीडा भारती या स्पर्धा २०१२ पासून भरवत आहे. या स्पर्धेतील प्रथम चार संघाना रोख पारितोषिक, करंडक, पदक व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. विजेत्यास एक लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. यात राज्यातील नामंवत १४ संघ व सोलापूर जिल्ह्यातील ६ अशा २० संघाना निमंत्रित केले आहे. ही स्पर्धा मॅटवर होत असून यासाठी दोन मैदाने तयार करण्यात आली आहेत. ही स्पर्धा प्रकाशझोतात सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या संघाची निवास व्यवस्था सरस्वती कन्या प्रशालेच्या वतीने व भोजन व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाच्या वतीने केली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी (२५ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री जयकुमार मोरे यांच्या हस्ते होईल. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख व अक्कलकोट भारतीचे अध्यक्ष अमोलराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेस क्रीडा भारतीचे अध्यक्ष डॉ विलास हरपाळे, शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे, भारतीय मजदूर संघाचे नरहरी मुळे, क्रीडा भारतीचे प्रांतमंत्री ज्ञानेश्वर मॅकल, सहमंत्री अरुण उपाध्ये, जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष मरगू जाधव, एल एस जाधव आदी उपस्थित होते.
अशी मिळणार पारितोषिके
प्रथम – एक लाख (महिला होमिओपॅथिक महाविद्यालय).
द्वितीय – ५० हजार (पदव्युत्तर महाविद्यालय, डॉ. विलास हरपाळे)
तृतीय – २० हजार (विद्या इंग्लिश स्कूल)
चतुर्थ – १० हजार (गोळवलकर गुरुजी).
स्पर्धेतील सहभागी संघ
ओम साई क्रीडा मंडळ (सांगली), साई सेवा मंडळ (छत्रपती संभाजीनगर), स्वराज्य क्रीडा मंडळ (भूम), जय हनुमान क्रीडा मंडळ (रेनापुर), जयहिंद क्रीडा मंडळ (श्रीरामपूर), शिवम क्रीडा मंडळ (पैठण), भैरवनाथ क्रीडा संघ भोसरी (पुणे), ओम साई संघ चिखली (पुणे), प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्टस् फाउंडेशन (पुणे), नवजीवन कबड्डी संघ (पुणे), अमर भारत क्रीडा मंडळ जे जे हॉस्पीटल (मुंबई), क्रीडा भारती संघ चिंचवड गार (पिंपरी चिंचवड), राकेश भाऊ घुले (पुणे), साई खेळाडू (परभणी).
सोलापूर ः स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, शंभूराजे कुमठे, श्रीकृष्ण स्पोर्ट्स, विघ्नहर्ता स्पोर्ट्स, अंजुमन क्रीडा, श्रीराम स्पोर्ट्स.