
क्रिकेट आणि वास्तुकलेचा शनिवारी आणि रविवारी भव्य संगम
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए) पुणे केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमसीए इंटरनॅशनल क्लब डिझाईन स्पर्धा प्रदर्शन हे क्रिकेट आणि वास्तुकलेमधील सर्जनशीलतेचा भव्य संगम ठरणार आहे. हे प्रतिष्ठित प्रदर्शन २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी पंडित फार्म्स, पुणे येथे भरवले जाणार आहे.
या प्रदर्शनाचा उद्देश एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, गहुंजे, पुणे येथे उभारल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या क्रीडा क्लब हाऊससाठी नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणे हा होता. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेस देशभरातील व्यावसायिक आर्किटेक्ट्स आणि आर्किटेक्चर विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेसाठी एकूण १४५ प्रवेशिका प्राप्त झाल्या, ज्यामध्ये ९८ व्यावसायिक आणि ४७ विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व संकल्पनांमध्ये एक जागतिक दर्जाच्या क्रिकेट क्लबच्या दृष्टीने नाविन्यपूर्णता, उपयुक्तता, शाश्वतता आणि सामाजिक समावेशाचे विचार मांडले गेले.

आर्किटेक्टर परिषदेच्या सहकार्याने आयोजित व आयआयए पुणे केंद्र यांच्या सहसंयोजनाने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी १० प्रथितयश आर्किटेक्ट्स व डिझाईन तज्ज्ञांच्या परीक्षक मंडळाने ३१ उत्कृष्ट संकल्पनांची निवड केली असून, त्यापैकी ११ अंतिम फेरीतील स्पर्धक ठरले आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, एमसीए इंटरनॅशनल क्लब डिझाईन स्पर्धा प्रदर्शनाची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. क्रिकेट आणि वास्तुकलेच्या संगमातून निर्माण झालेल्या या उपक्रमाने एक अशा जागेची संकल्पना उभारली आहे जी केवळ खेळापुरती मर्यादित नसून ती सामाजिक बांधिलकी आणि उत्कृष्टतेची प्रेरणा देणारा केंद्रबिंदू ठरेल. या स्पर्धेसाठी देशभरातील आर्किटेक्ट्सनी दिलेला प्रतिसाद प्रेरणादायी आहे. हे केवळ स्थापत्यकलेचे प्रदर्शन नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
आयआयए पुणे केंद्राचे अध्यक्ष विकास आचळकर यांनी सांगितले की, एमसीए सोबत ही स्पर्धा सहसंयोजित करताना आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो. या स्पर्धेमुळे स्थापत्यकलेमधून समाज, परंपरा आणि शाश्वततेबाबत एक समृद्ध संवाद घडून आला आहे. पंडित फार्म्स येथे होणारे प्रदर्शन हे सामूहिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि वास्तुशास्त्रीय उत्कृष्टतेचा उत्सव आहे. तसेच प्रत्येक स्पर्धकाच्या दृष्टिकोनातून भविष्यातील क्रीडा सुविधा कशा असाव्यात, हे उलगडून दाखवते. आम्ही सर्व आर्किटेक्चर व क्रिकेटप्रेमींना या अद्वितीय प्रदर्शनाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन करतो.
या प्रदर्शनात ३,००० हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती अपेक्षित आहे, ज्यामध्ये आर्किटेक्ट्स, विद्यार्थी, नागरी नियोजन तज्ज्ञ, क्रीडा प्रशासक आणि डिझाईन क्षेत्रातील व्यावसायिकांचा समावेश असेल. भारतातील स्थापत्यशास्त्रातील नव्या विचारांचे दर्शन या प्रदर्शनातून घडणार आहे.