
हर्षल पटेल विजयाचा हिरो, इशान किशन, कामिंडू मेंडिसची दमदार फलंदाजी
चेन्नई : सनरायझर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पाच विकेट राखून हरवले. हैदराबादच्या या दणदणीत विजयानंतर चेन्नई संघाचे प्लेऑफ गाठण्याचे स्वप्न आता संपुष्टात आले आहे. चेन्नई संघाचा नऊ सामन्यातील हा सातवा पराभव ठरला. हैदराबाद संघाने १८.४ षटकात पाच बाद १५५ धावा फटकावत चेन्नईला पराभूत केले. २८ धावांत चार विकेट घेणारा हर्षल पटेल हा विजयाचा हिरो ठरला.
सनरायझर्स हैदराबाद संघासमोर विजयासाठी १५५ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबाद संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. धमाकेदार फलंदाज अभिषेक शर्मा (०) फक्त दोन चेंडू खेळून बाद झाला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेड व इशान किशन या जोडीने ३७ धावांची भागीदारी केली. अंशुल कंबोज याने हेड याची आक्रमक १९ धावांची खेळी संपुष्टात आणली. हेड याने चार चौकार मारले. सहाव्या षटकात हैदराबाद संघाला दुसरा धक्का बसला.

रवींद्र जडेजा याने धोकादायक फलंदाज हेनरिक क्लासेन याला अवघ्या ७ धावांवर बाद करुन मोठा अडथळा दूर केला. इशान किशन याने ३४ चेंडूत ४४ धावांची दमदार खेळी करुन सामन्यात थोडी रंगत आणली. त्याने पाच चौकार व एक षटकार मारला. नूर अहमद याने त्याला बाद केले. नूर अहमद याने अनिकेत वर्मा याला १९ धावांवर बाद करुन सामन्यातील स्वत:चा दुसरा बळी मिळवला. अनिकेत याने दोन टोलेजंग षटकार मारले. कामिंडू मेंडिस व नितीन कुमार रेड्डी या जोडीने आक्रमक फलंदाजी करत १९व्या षटकात संघाला पाच विकेटने विजय मिळवून दिला. मेंडिस याने २२ चेंडूत नाबाद ३२ धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार मारले. नितीन रेड्डी याने १३ चेंडूत नाबाद १९ धावा फटकावल्या. रेड्डीने दोन चौकार मारले. नूर अहमद याने ४२ धावांत दोन गडी बाद केले. खलील अहमद (१-२१), अंशुल कंबोज (१-१६), रवींद्र जडेजा (१-२२) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
चेपॉकवर २०१९ नंतर चेन्नई ऑलआउट
हर्षल पटेलच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जला १५४ धावांवर रोखले. २०१९ नंतर चेपॉकवर संघ ऑलआउट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर चेन्नईने हैदराबादसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यांच्याकडून डेवाल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक ४२ धावांची खेळी खेळली.
हैदराबादकडून हर्षल पटेलने चार तर पॅट कमिन्स आणि जयदेव उनाडकटने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमी आणि कामिंदू मेंडिस यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
या सामन्यात चेन्नईने धक्क्याने सुरुवात केली. पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने शकिब रशीदची विकेट घेतली. त्याला त्याचे खाते देखील उघडता आले नाही. त्यानंतर, हर्षल पटेलने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या सॅम करनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आयुष म्हात्रे हा ४७ धावसंख्येवर बाद झाला.
कमिन्सने त्याची विकेट घेतली. त्याला फक्त ३० धावा करता आल्या. १९ चेंडूत त्याने सहा चौकार मारले. या सामन्यात, डेवाल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक ४२ धावा केल्या. त्याच्याशिवाय दीपक हुड्डा याने २२, रवींद्र जडेजाने २१ आणि शिवम दुबे याने १२ धावा केल्या. कारकिर्दीतील ४०० वा टी २० सामना खेळण्यासाठी आलेल्या धोनीला फक्त सहा धावा करता आल्या. दरम्यान, अंशुल कंबोज आणि नूर अहमद प्रत्येकी फक्त दोन धावा करून बाद झाले. खलील अहमद एक धाव काढल्यानंतर नाबाद राहिला.