
मलेशिया हॉकी फेडरेशनचा निर्णय
क्वालालंपूर ः फक्त ८.८३ लाख रुपयांची थकबाकी असल्यामुळे मलेशियाने अझलन शाह कप हॉकी स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाला आमंत्रण दिले नाही. या प्रकारामुळे पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आहे.
क्रिकेट नंतर आता पाकिस्तानला हॉकीमध्येही टीकेचा सामना करावा लागत आहे. पैसे न दिल्यामुळे पाकिस्तानला एकाही मोठ्या स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. मलेशिया हॉकी फेडरेशनने जोहर हॉकी असोसिएशनला १०,३४९ अमेरिकन डॉलर्स (८.८३ लाख रुपये) थकबाकी न भरल्यामुळे पाकिस्तानला वार्षिक अझलन शाह कपसाठी आमंत्रित केलेले नाही. पाकिस्तान हॉकी फेडरेशन (पीएचएफ) मधील एका सूत्राने सांगितले की, जोहर असोसिएशनने पीएचएफला अधिकृत पत्र पाठवले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये संघासोबत मलेशियाला गेलेल्या पीएचएफ अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निवास, प्रवास आणि इतर खर्चासाठी द्यावयाच्या रकमेचा देखील त्यात विशेषतः उल्लेख आहे.
पाकिस्तानी अधिकारी आलिशान हॉटेलमध्ये राहिले
पाकिस्तान संघ जोहोर हॉकी कप खेळण्यासाठी मलेशियाला गेला होता आणि काही पीएचएफ अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय देखील संघासोबत होते. पाकिस्तान संघाचा निवास आणि इतर खर्च आयोजकांनी करायचा होता परंतु पीएचएफ अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की त्यांना त्यांचा सर्व खर्च स्वतः करावा लागेल, असे एका सूत्राने सांगितले. हे अधिकारी देखील त्याच आलिशान हॉटेलमध्ये राहिले जिथे संघ राहत होते. यामध्ये पीएचएफचे माजी अध्यक्ष देखील समाविष्ट होते.
जोहर संघाने पाकिस्तानला धमकी दिली
जोहोर असोसिएशनने आधीच मलेशियन फेडरेशनसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे आणि जर थकबाकी भरली नाही तर हा विषय आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडे नेण्याची धमकी दिली आहे. सूत्रांनी सांगितले की, ‘विद्यमान पीएचएफ अध्यक्ष आणि त्यांची टीम या प्रकरणावर नाराज आहेत कारण फेडरेशन आधीच आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि त्यांना पीएचएफच्या माजी अधिकाऱ्यांनी केलेल्या या खर्चाची माहिती नव्हती.’ सुलतान अझलन शाह कप २२ ते २९ नोव्हेंबर दरम्यान मलेशियातील इपोह येथे होणार आहे.