
मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग : आर्यराज निकम सामनावीर
मुंबई : मुंबई पोलिस सिटी रायडर्स संघाने आपल्या शेवटच्या साखळी लढतीत ठाणे मराठाज् संघाविरुद्ध ६ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एमसीसी आयोजित १० व्या मित्सुई शोजी टी २० क्रिकेट लीग मधील सुपर लीग मध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली.
पोलिस जिमखाना येथे झालेल्या या लढतीत ठाणे मराठाज् संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला; पण तो निर्णय त्यांच्यावरच बूमरँग ठरला. शाश्वत जगताप (४०) आणि दिव्यांश सक्सेना (९) या जोडीने झटपट ३५ धावांची सलामी दिली तर नंतर शाश्वतने रिदय खांडके (१३) यांच्यासह दुसऱ्या विकेटसह २९ धावांची भर टाकली. मात्र नंतर सिद्धांत अधटराव (१६), मॅक्सवेल स्वामिनाथन (१५) यांच्यानंतर त्यांचे अन्य फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत आणि त्यांचा डाव १६.१ षटकांतच १२० धावांत गडगडला. मुंबई पोलिसांचा डावखुरा फिरकी गोलंदाज आर्यराज निकम याने अप्रतिम गोलंदाजी करताना केवळ १८ धावांत ४ विकेट्स मिळविल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना सुनील पाटील (३४) आणि आर्यराज निकम (५३) या जोडीने अर्धशतकी सलामी देताना आक्रमक फलंदाजी केली. निकमने नंतर ऋतुराज साने (नाबाद २४) यांच्यासह तिसऱ्या विकेटसाठी आणखी ५१ धावांची भागी रचून संघाचा विजय निश्चित केला. आर्यराजने ४६ चेंडूत ५३ धावा करताना ७ चौकार आणि २ षटकार ठोकले. मुंबई पोलिस सिटी रायडर्स संघाने १०.४ षटकांत ४ बाद १२१ धावा करून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आर्यराज निकम याचीच सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.
बुधवारी (३० एप्रिल) होणाऱ्या अंतिम फेरीत मुंबई पोलिस सिटी रायडर्स आणि शिवाजी पार्क वॉरियर्स या बलाढ्य संघांमध्ये लढत होईल. मुंबई पोलीस जिमखाना येथे होणारी ही लढत प्रकाशझोतात खेळविली जाणार आहे. या स्पर्धेला पुरस्कर्ते म्हणून विविध पुरस्कर्ते लाभले असून यात चेंडूंसाठी ए एनएम., आऊटडोअर होर्डिंग पार्टनर म्हणून ग्लोबल तर स्पर्धेची पारितोषिके प्रोबस इन्शुरन्स ब्रोकर यांनी पुरस्कृत केलेली आहेत. स्पर्धेत एकूण अडीच लाख रुपयांची पारितोषिके रोख आणि ट्रॉफीजच्या स्वरूपात देण्यात येणार आहेत.
संक्षिप्त धावफलक
ठाणे मराठाज् ः १६.१ षटकांत सर्वबाद १२० (शाश्वत जगताप ४०, रिदय खांडके १३, सिद्धांत अधटराव १६, मॅक्सवेल स्वामिनाथन १५, आर्यराज निकम १८ धावांत ४ बळी) पराभूत विरुद्ध मुंबई पोलिस सिटी रायडर्स ः १०.४ षटकांत ४ बाद १२१ (सुनील पाटील ३४, आर्यराज निकम ५३, ऋतुराज साने नाबाद २४; विराज जाधव ३ धावांत २ बळी). सामनावीर ः आर्यराज निकम.