
प्रियांश आर्य-प्रभसिमरन यांची विक्रमी भागीदारी, पंजाब किंग्जची शानदार फलंदाजी
कोलकाता : वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या पावसामुळे आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि गतविजेत्या केकेआर संघातील सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाचे पारडे जड होते. परंतु, पावसामुळे दुसऱ्या डावात केवळ एकच षटक खेळ होऊ शकला. उभय संघात प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला. पंजाबचे ११ गुण झाले आहेत. केकेआर संघ सात गुणांवर आहे.

गतविजेत्या केकेआर संघासमोर घरच्या मैदानावर विजयासाठी २०२ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सुनील नरेन व रहमानउल्लाह गुरबाज ही सलामी जोडी मैदानात उतरली. सुनील नरेन याने एक चौकार ठोकत नाबाद ४ धावा काढल्या तर गुरबाज याने तीन चेंडूत खेळत १ धाव काढली. पहिल्या षटकात केकेआर संघाने बिनबाद ७ धावा काढल्या. त्यानंतर पावसाचे जोरदार आगमन झाले. काही वेळाने पाऊस थांबला व सामना सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली. तेव्हा परत एकदा पावसाने हजेरी लावली. ९.३५ वाजता पहिल्यांदा जोरदार वाऱ्यासह पावसाने मैदानावर धडक मारली. त्यानंतर १०.१० वाजता पाऊस थांबला. मात्र, पावसाने १०.३१ वाजता पुन्हा जोरदार बरसण्यास सुरुवात केली. १०.५८ वाजता पंचांनी सामना रद्द करण्याची घोषणा केली.
पंजाब किंग्ज संघाचा धावांचा
पाऊस आयपीएलच्या ४४ व्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. त्यानंतर खऱ्या पावसाने हजेरी लावली. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी त्याचा निर्णय बरोबर असल्याचे सिद्ध केले. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे सर्व जुने विक्रम मोडले गेले.
कोलकात्यात पंजाबची सिंह गर्जना
प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी कोलकाताविरुद्ध चमकदार कामगिरी केली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये १२० धावांची भागीदारी झाली. या आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध कोणत्याही सलामी जोडीने केलेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे. त्याआधी, गुजरात टायटन्सच्या शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली होती.
या सामन्यात प्रियांश आणि प्रभसीमन यांच्या बॅटने जोरात गर्जना केली. या दोघांनी केकेआर संघाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. प्रियांशने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक २७ चेंडूत पूर्ण केले तर प्रभसिमरनने ३८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दोघेही अनुक्रमे ६९ आणि ८३ धावांच्या खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतले. २३ वर्षीय फलंदाज प्रियांश आयपीएल २०२५ मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला. त्याने २२२ धावा केल्या. या बाबतीत त्याने यशस्वी जयस्वालला मागे टाकले ज्याने या आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये २१३ धावा केल्या आहेत.
१२व्या षटकात प्रियांश ६९ धावांवर बाद झाला. त्यानंतर प्रभसिमरन व श्रेयस अय्यर या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन ८३ धावांवर बाद झाला. त्यानंतर मॅक्सवेल (७), जॅनसेन (३) हे लवकर बाद झाले. अय्यर याने १६ चेंडूत नाबाद २५ धावा फटकावल्या. त्याने एक चौकार व एक षटकार मारला. जोश इंगलिश याने ६ चेंडूत नाबाद ११ धावा काढल्या. त्याने दोन चौकार मारले. पंजाब किंग्ज संघाने २० षटकात चार बाद २०१ अशी भक्कम धावसंख्या उभारली.
केकेआर संघाकडून वैभव अरोरा याने ३४ धावांत दोन गडी बाद केले. वरुण चक्रवर्ती याने ३९ धावांत एक तर रसेल याने २७ धावांत एक विकेट घेतली.
कोलकाता विरुद्धची सर्वोच्च सलामी भागीदारी
प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य १२०
शुभमन गिल आणि साई सुदर्शन ११४
मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम ९९
विराट कोहली आणि फिल साल्ट ९५
पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
प्रियांश आर्य २२२
यशस्वी जयस्वाल २१३
फिल सॉल्ट २१२
साई सुदर्शन २०३
मिचेल मार्श १९६