शानदार विजयासह आरसीबी संघाची अव्वल स्थानावर झेप 

  • By admin
  • April 27, 2025
  • 0
  • 7 Views
Spread the love

दिल्ली कॅपिटल्स संघावर सहा विकेटने विजय, कृणाल पंड्या, विराट कोहलीचे दमदार अर्धशतक 

दिल्ली : अनुभवी विराट कोहली (५१) आणि कृणाल पंड्या (नाबाद ७३) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर आरसीबी संघाने दिल्ली कॅपिटल्स संघावर सहा विकेट राखून विजय नोंदवत १४ गुणांसह गुण तालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. 

आरसीबी संघासमोर विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना आरसीबी संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकात सलामीवीर जेकब बेथेल (१२) याला बाद करुन अक्षर पटेल याने पहिला धक्का दिला. पाठोपाठ अक्षर पटेलने देवदत्त पडिक्कल (०) याला क्लिनबोल्ड करून आरसीबी संघावर दबाव वाढवला. कर्णधार रजत पाटीदार याला ६ धावांवर धावबाद करून करुण नायर याने आरसीबीला मोठा धक्का दिला. 

डावातील चौथ्या षटकात आरसीबी संघाची स्थिती तीन बाद २६ अशी बिकट झाली. अनुभवी विराट कोहलीवर मोठी जबाबदारी आली. कोहलीला साथ देण्यासाठी कृणाल पंड्या मैदानात उतरला. विराट कोहली व कृणाल पंड्या या जोडीने शानदार फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी करत संघाला विजयासमीप आणले. विराट कोहली याने ४७ चेंडूंचा सामना करत ५१ धावा फटकावल्या. कोहलीने चार चौकार मारले. कोहलीची ही अर्धशतकी खेळी वेगळी ठरली. त्याने कृणाल पंड्याला आक्रमक फटके मारण्यासाठी प्रोत्साहित केले.

कृणाल याने दमदार फलंदाजी करत सामन्याचे चित्र बदलून टाकले. कृणाल पंड्या याने ४७ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कृणालने कठीण परिस्थितीत कोहली समवेत शानदार भागीदारी केली. त्याने चार षटकार व पाच चौकार मारले. टिम डेव्हिड याने ५ चेंडूत नाबाद १९ धावा काढल्या. त्याने एक षटकार व तीन चौकार मारुन संघाचा विजय निश्चित केला. आरसीबी संघाने १८.३ षटकात चार बाद १६५ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला. अक्षर पटेल (२-१९), चामीरा (१-२४) यांनी विकेट घेतल्या. 

दिल्लीची फलंदाजी गडगडली

केएल राहुलच्या ४१ आणि ट्रिस्टन स्टब्सच्या ३४ धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने आरसीबी संघाविरुद्ध २० षटकात आठ बाद १६२ धावा काढल्या. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर दिल्लीने १६२ धावसंख्या उभारली. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारने तीन तर हेझलवूडने दोन विकेट घेतल्या. याशिवाय यश दयाल आणि कृणाल पंड्या यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

या सामन्यात दिल्ली संघाच्या डावाची सुरुवात चांगली झाली. अभिषेक पोरेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी पहिल्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. हेझलवूडने पोरेलला आपला बळी बनवले. तो ११ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांसह २८ धावा काढून बाद झाला. यानंतर यश दयालने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या करुण नायरला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याला फक्त चार धावा करता आल्या. पोरेल-नायर बाद झाल्यानंतर त्यांचा डाव गडगडला. एका बाजूने ठराविक अंतराने फलंदाज बाद होत असताना केएल राहुलने तीन चौकारांसह ४१ धावा केल्या तर स्टब्सने १८८.८८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ३४ धावा केल्या. कर्णधार अक्षर पटेलने १५, आशुतोष शर्माने दोन आणि विप्राज निगमने १२ धावा केल्या. त्याच वेळी, मिचेल स्टार्क आणि दुष्मंथा चामीरा खाते न उघडता नाबाद राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *