खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेसाठी बीडच्या पाच रग्बी खेळाडूंची निवड

  • By admin
  • April 28, 2025
  • 1
  • 88 Views
Spread the love

बीड ः भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभाग अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या खेलो इंडिया युथ गेम साठी बीड जिल्हा रग्बी असोसिएशनच्या पाच खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा १५ मे पासून सुरू होत आहे.

या स्पर्धेसाठी नुकत्याच महाराष्ट्र रग्बी संघाची निवड चाचणी नाशिक येथे संपन्न झाली. निवड चाचणीत महाराष्ट्रातील विविध वयोगटामध्ये १०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यामधून बीड जिल्हा रग्बी असोसिएशनचे खेळाडू वेदांत गोरख डावकर, आदिती सखाराम लोंढे , किर्ती किरण जाधव, दीपाली दिलीप ताटे व समीक्षा अरुण ताटे या ५ खेळाडूंची रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या राज्य संघात निवड झाली आहे.

नाशिक येथे संपन्न झालेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय रग्बी निवड चाचणी स्पर्धेत बीड जिल्ह्याचा खेळाडू सुरज येवले याची महाराष्ट्र संघात निवड झाली. बीडचा पहिला खेळाडू म्हणून त्याने वरिष्ठ गट महाराष्ट्र संघात स्थान निश्चित केले आहे. या कामगिरीबद्दल सुरजचे कौतुक होत आहे. मार्च महिन्यात झालेल्या नॅशनल गेम्स स्पर्धेत राज्य संघामध्ये स्थान मिळण्यापासून वंचित राहिलेल्या सुरजने वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेसाठी जोरदार तयारी करून आपले स्थान महाराष्ट्र राज्य संघात निश्चित केले. या सर्व खेळाडूंनी मैदानावरचे सातत्य, नियमित व्यायाम, सराव, कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटी या जोरावर आपले स्थान महाराष्ट्र संघात निश्चित केले आहे.

आजपर्यंतचा रग्बी मधील महाराष्ट्राचा इतिहास पाहता महाराष्ट्र संघाने कायम पहिल्या तीन संघात स्थान मिळवले आहे. हे सर्व खेळाडू रोज मोरया क्रीडा मंडळ, तुळजाई चौक,कॅनॉल रोड, नाट्यगृह जवळ मंडळाच्या मैदानावर वर्षभर सराव करतात. मोरया क्रीडा मंडळ बीडचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय रग्बी प्रशिक्षक, बीड जिल्हा रग्बी मुख्य प्रशिक्षक नितीन येळवे, कारागृह पोलीस व रग्बी प्रशिक्षक शोएब खाटीक आणि मोरया क्रीडा मंडळाचे सचिव अशोक चौरे यांनी खेळाडूंची निवड महाराष्ट्र संघात होण्याकरिता सर्व खेळाडूंचा कसून सराव करून घेत आहेत.

बीड जिल्ह्यातील खेळाडूंच्या चमकदार कामगिरीबद्दल रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव नासेर, सहसचिव संदीप मोसमकर, ईश्वर कोटरकी आणि बीड जिल्हा रग्बी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष इसाक शेख, सचिव महेश घुले, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, कार्याध्यक्ष नितीन येळवे, कारागृह पोलीस तसेच प्रशिक्षक शोएब खाटीक, प्रशिक्षक अशोक चौरे, साईनाथ राजे, भगवानराव बागलाने, यश जाधव, शिवराज देवगुडे, सतीश तकिक, अदनान शेख, सुरज येडे, ईश्वर कानडे, ओंकार मोरे, आकाश खांडे, संदीप वडमारे, राष्ट्रीय पंच संभाजी गिरे, विशाल ढास इतर सर्व पदाधिकारी आणि समस्त मोरया क्रीडा मंडळ परिवार बीड आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

1 comment on “खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेसाठी बीडच्या पाच रग्बी खेळाडूंची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *