
बीड जिल्हा क्रीडा संकुलात कार्यक्रमाचे आयोजन
बीड ः पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक प्राप्त करणारी भारतीय संघाची कर्णधार प्रियंका हनुमंत इंगळे व तिच्या आई-वडिलांचा जिल्हा क्रीडा कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड व विविध एकविध जिल्हा क्रीडा संघटना, क्रीडा मंडळ, क्रीडा क्लब यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
बीड जिल्हा क्रीडा संकुल येथे ज्येष्ठ क्रीडा संघटक, राज्य खो-खो संघटनेचे माजी सरचिटणीस प्रा जे पी शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि महाराष्ट्र राज्य तायक्वांदो असोसिएशचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ऋषिकेश शेळके, माजी महाराष्ट्र राज्य राज्य क्रीडा परिषद सदस्य तथा हॉकी व सॉफ्टबॉल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा दिनकर थोरात, जिल्हा खो-खो संघटनेचे सचिव विजय जाहेर, राज्य खो-खो संघटना सहसचिव वर्षा कच्छवा, आदर्श क्रिकेट क्लबचे राष्ट्रीय प्रशिक्षक शेख अझहर, जिमखाना क्रिकेट क्लबचे प्रशिक्षक निसार तांबोळी, योगेश सोळसे, अकबर खान, क्षितिजा गव्हाणे, क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, क्रीडा मार्गदर्शक अविनाश पाटील, सतीश राठोड, जितेंद्र आराक, वैभव गिरी, रमेश शिंदे, प्रफुल्ल हटवटे, विष्णू काकडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खो-खो संघटनेचे सचिव विजय जाहेर यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी मार्गदर्शन करताना उपस्थित सर्व खेळाडूंनी प्रियंका इंगळे यांचा आदर्श घेवून जिल्हा, राज्य व देशासाठी खेळात उत्कृष्ट कामगिरी करावी असे आवाहन केले. जे पी शेळके यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना बीड जिल्ह्याची भूमीकन्या प्रियंका इंगळे यांनी खो-खो खेळात दैदिप्यमान प्रगती करत जागतिक विश्वचषक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले तसेच जिल्ह्यातील खेळाडूंनी प्रियंका इंगळेचा आदर्श घेवून खेळामध्ये स्वतःचे व जिल्ह्याचे नाव उंचवावे, खो-खो खेळ हा जागतिक स्पर्धेत गेला आहे तो लवकरच ऑलिम्पिक स्पर्धेत समाविष्ट होईल असे ते म्हणाले.
प्रियंका इंगळे हिने सत्काराला उत्तर देताना बीड जिल्हावासियांचे, जिल्हा क्रीडा कार्यालय व सर्व खेळाडू, क्रीडा संघटक यांचे सत्काराच्या निमित्ताने आभार व्यक्त केले. मी माझ्या आई, वडील व मार्गदर्शक यांच्या सहकार्यामुळे मी या यशापर्यंत पोहवू शकले असे तिने सांगितले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, क्रीडा मार्गदर्शक अविनाश पाटील, सतीश राठोड, जितेंद्र आराक, खो-खो संघटनेचे विजय जाहेर, प्रफुल्ल हाटवटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव जायगुडे यांनी केले.