
एनजीसीए करंडक १४ वर्षांखालील क्रिकेट – आनंद शेंडे सामनावीर, निशिकेश गज्जम मालिकावीर
सोलापूर ः नीलेश गायकवाड क्रिकेट अकादमीने एनजीसीए करंडक १४ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकाविले. आनंद शेंडे याने सामनावीर तर निशिकेश गज्जम याने मालिकावीर पारितोषिक पटकाविले.
निलेश गायकवाड क्रिकेट अकादमीने आयोजित केलेली ही स्पर्धा डोणगाव रोडवरील पुष्प जिमखाना मैदानावर झाली. यात ८ संघानी भाग घेतला होता. अंतिम सामन्यात निलेश गायकवाड क्रिकेट अकादमीने मास्टर अकादमीवर १०२ धावांनी विजय मिळविला.
एनजीसीए संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ६ बाद २६० धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये ऋग्वेद पाटील ६३, संग्राम पवार ४१, आनंद शेंडे ३९, देवांशू बगलेने ३४ धावा केल्या. मास्टर्स क्रिकेट अकॅडमीकडून गोलंदाजीत प्रशांत जाधवने ३८ धावांत दोन बळी टिपले. सूर्यअंजन मुसळे, निशिकेश गज्जम व विवेक बनसोडे यांनी प्रत्येकी गडी बाद केला. विजयी २६१ धावांचे लक्ष्य मास्टर मास्टर्स क्रिकेट अकॅडमीस पेलवले नाही. त्यांना निर्धारित ५० षटकात ९ बाद १५८ धावा करता आल्या.
सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन टूर्नामेंट कमिटीचे चेअरमन संजय वडजे व निवड समिती चेअरमन राजेंद्र गोटे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी इंदापूरचे उद्योगपती पवार व बार्शीचे उद्योगपती दिनेश येवणकर, राहुल म्हेत्रे, विनोद पाटील, कीर्तिकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजक निलेश गायकवाड यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू गायकवाड यांनी केले.
वैयक्तिक पारितोषिके
आनंद शेंडे (सामनावीर).
ऋग्वेद पाटील (फलंदाज),
निशिकेश गज्जम (मालिकावीर).
अनुज वाल्मिकी (गोलंदाज).
यशराज टेकाळे (यष्टीरक्षक).