
लेफ्टनंट कर्नल माणिक त्रेहान उपविजेते
नाशिक ः मीनका रिव्हरडेल गोल्फ कप २०२५ अजिंक्यपद स्पर्धेत कर्नल मच्छिंद्र शिरसाठ यांनी विजेतेपद पटकावले तर लेफ्टनंट कर्नल माणिक त्रेहान यांनी उपविजेतेपद संपादन केले.
मीनका रिव्हरडेल गोल्फ या स्पर्धेचे आयोजन रिव्हरसाइड गोल्फ कोर्स निफाड या ठिकाणी करण्यात आले होते. वेगवेगळ्या गटात स्पर्धा खेळवण्यात आली. यामध्ये ज्युनियर गट, कॅडी गट आणि खुला गट या तीन गटांचा समावेश होता. रिव्हरसाइड गोल्फ कोर्स निफाड नाशिक येथे एका दिमाखदार सोहळ्यात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेल्या खुल्या गटाच्या स्पर्धेत ७१ गोल्फपटू सहभागी झाले होते. यामध्ये मुख्यत्वे नाशिक मधील एअर फोर्स, आर्मी तथा स्कूल ऑफ आर्टीचे स्पर्धक, नाशिक मधील रिव्हरसाइड गोल्फ कोर्सचे सभासद आणि मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर असे एकूण ७१ स्पर्धक सहभागी झाले होते.
एकूण ९ (नऊ) होलच्या या स्पर्धेत ७१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये कर्नल मच्छिंद्र शिरसाठ यांनी ही स्पर्धा जिंकली. लेफ्टनंट कर्नल माणिक त्रेहान यांनी द्वितीय स्थान प्राप्त केले.
स्कूल ऑफ आर्टीचे कमांडट लेफ्टनंट जनरल एन एस सरना यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. लेफ्टनंट जनरल एन एस सरना यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले. नाशिकमधील या रिव्हरसाइड गोल्फ कोर्स मधून भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील आणि देशाचे नाव उज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला.
याच कार्यक्रमात रिव्हरसाइड रिसॉर्टचे उद्घाटन जीसीएस आणि एमएआय नवी दिल्ली अध्यक्ष विंग कमांडर अरुण कुमार सिंग यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की. नाशिकला गोल्फ या खेळाचा फार मोठा इतिहास आहे. या रिव्हरसाइड गोल्फ कोर्समुळे हा इतिहास जागृत ठेवण्याचा प्रयत्न यातून होतो आहे. या रिसॉर्टमुळे हे सेंटर गोल्फ पर्यटन होणार आहे. भारतातील नामवंत खेळाडू येथे येतील असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. फ्लाईंग कलर्सच्या शाळेतील मुलांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला.
या प्रसंगी अर्पणा डेव्हलपर्सचे संचालक मानव अग्रवाल, बिझनेस डेव्हलपमेंटचे आनंद ताडगे याशिवाय वासन टोयोटाचे सेल्स मॅनेजर रवींद्र बैरागी, अजय पाटील, जयदीप कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्पर्धेचे आयोजक आणि रिव्हरसाइड गोल्फ कोर्सचे संचालक विंग कमांडर प्रदीप बागमार, शितल बागमार यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन सुरेंद्र पुजारी यांनी केले. याप्रसंगी रिव्हरसाइड गोल्फ कोर्सचे श्रेयस बागमर, नितीन हिंगमिरे, मनीष शहा आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१) नीयर टू द पीन : एअर कमोडर मनीष दैलानी (२२ फूट जवळ)
२) लाँगेस्ट ड्राईव्ह : विजय पवार (३२२ यार्ड)
३) सेंटर लाईन : देवेंद्र सिंग (११ इंच)
खुला गट :
१) कर्नल मच्छिंद्र शिरसाठ
२) लेफ्टनंट कर्नल माणिक त्रेहान