
माहीम : विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर आणि मैदानात उत्साहाचा झंकार यांचे सुंदर संमेलन…सरस्वती मंदिर शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी क्रीडा शिबिराला दिमाखदार सुरुवात झाली. गेली ३५ वर्षे शाळा दर उन्हाळ्यात विद्यार्थ्यांसाठी हे विनामूल्य क्रीडा शिबिर आयोजित करत असून यावर्षीच्या शिबिराने खास वेगळेपण जपले आहे.
या वर्षीच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना ९० च्या दशकातील हरवलेल्या पारंपरिक खेळांचा नवा अनुभव देण्याचा उपक्रम! आट्यापाट्या, विटी-दांडू, लगोरी, किती किती, गोट्या, भोवरा, पेस, रस्सीखेच असे अनेक जुन्या काळातील खेळ मैदानात रंगले. शारीरिक तंदुरुस्ती साधताना सांस्कृतिक वारशाची पुनःआठवण करून देणाऱ्या या शिबिराला विद्यार्थ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक शिंदे (मार्केटिंग राष्ट्रीय प्रमुख, सामना), डॉ आशिष मुळगावकर (ट्रस्टी), डलेश देसाई (कमिटी सदस्य), शाळेच्या उपमुख्याध्यापिका शामला बिनसाळे, सुधाकर राऊळ, शिरीन व संकेत डायमा उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरात चमकदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस गुप्ता, गैरेश मस्कर, आरोही खारनगाटे आणि प्रतीक्षा मोरे यांना “उत्कृष्ट शिबिरार्थी” म्हणून गौरविण्यात आले.
उन्हाळी सुट्टीत नवीन उर्जेने भारावलेले विद्यार्थी, सांस्कृतिक वारशाची गोडी, आणि खेळाच्या आनंदाने फुललेले वातावरण यामुळे सरस्वती मंदिर शाळेचे हे शिबिर एक संस्मरणीय पर्व ठरते आहे.