
प्रतिका रावल, स्नेह राणाची लक्षवेधक कामगिरी, ब्रिट्सचे शतक व्यर्थ
कोलंबो ः प्रतिका रावल (७८) आणि स्नेह राणा (५-४३) यांच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने तिरंगी एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिका महिला संघाचा चुरशीच्या लढतीत १५ धावांनी पराभव केला. या मालिकेत भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे.
प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना झाला. भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने ५० षटकात सहा बाद २७६ धावसंख्या उभारली. प्रतिका रावल व स्मृती मानधना या सलामी जोडीने ८३ धावांची भागीदारी करुन संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. स्मृती मानधना हिने ५४ चेंडूत ३६ धावा फटकावल्या. तिने पाच चौकार मारले. त्यानंतर प्रतिका रावल व हरलीन देओल या जोडीने दुसऱया विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. प्रतिका रावल हिने ९१ चेंडूत ७८ धावांची बहारदार खेळी केली. तिने सात चौकार व एक षटकार मारला. या खेळीत प्रतिकाने सर्वात कमी सामन्यात ५०० धावा फटकावण्याचा पराक्रम केला आहे.

हरलीन देओल हिने ४७ चेंडूत २९ धावा काढल्या. तिने चार चौकार मारले. कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ४८ चेंडूत नाबाद ४१ धावा काढल्या. तिने चार चौकार मारले. जेमिमा रॉड्रिग्ज हिने ३२ चेंडूत ४१ धावांची जलद खेळी साकारली. तिने चार चौकार मारले. रिचा घोष हिने १४ चेंडूत २४ धावा फटकावल्या. तिने तीन चौकार व एक षटकार मारला. दीप्ती शर्मा ९ धावांवर बाद झाली. काशवी गौतम हिने नाबाद ५ धावांचे योगदान दिले. म्लाबा हिने ५५ धावांत दोन गडी बाद केले.
दक्षिण आफ्रिका महिला संघासमोर विजयासाठी २७७ धावांची आवश्यकता होती. लाझमीन ब्रिट्स व लॉरा वोल्वार्ड या सलामी जोडीने १४० धावांची भागीदारी करुन संघाची स्थिती भक्कम केली. त्यावेळी आफ्रिका संघ सहजपणे जिंकेल असेच चित्र होते. मात्र, दीप्ती शर्मा हिने वोल्वार्ड हिला ४३ धावांवर बाद करुन पहिला धक्का दिला. त्यानंतर स्नेह राणा हिने ब्रिट्सची शतकी खेळी १०९ धावांवर संपुष्टात आणत मोठे यश मिळवून दिले. ब्रिट्स हिने १०७ चेंडूत १३ चौकार व ३ षटकार ठोकत १०९ धावा काढल्या. ब्रिट्स बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला.
सुने लुस (२८), क्लो ट्रायॉन (१८), डर्कसेन (३०) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज धावांचा दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. ४९.२ षटकात २६१ धावांवर त्यांचा डाव संपुष्टात आला. भारताने रोमांचक सामना १५ धावांनी जिंकला.
भारताच्या स्नेह राणा हिने ४३ धावांत पाच विकेट घेऊन विजयात मोलाचा वाटा उचलला. अरुंधती रेड्डी (१-५९), चरणी (१-५१), दीप्ती शर्मा (१-४०) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.