कोल्हापूर येथे एमसीए क्रिकेट मैदान विकसित करणार

  • By admin
  • April 30, 2025
  • 0
  • 83 Views
Spread the love

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटना, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस यांच्याशी समझोता करार

कोल्हापूर ः प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजचे क्रिकेट मैदान विकसित करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटना, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटना यांच्यात समझोता करार झाला आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसएशनचे अध्यक्ष माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉ के जी पाटील यांच्या संयुक्तिक प्रयत्नामुळे कोल्हापूर येथे किक्रेट मैदान विकसित होणार आहे.

हाॅटेल सयाजी येथे झालेल्या संयुक्तिक समारंभात कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसएशनचे अध्यक्ष माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉ के जी पाटील यांच्या उपस्थितीत मैदानाच्या विकासाबाबतचा समझोता करारावर उभयतांच्या स्वाक्षरी करण्यात आल्या.

एमसीएने राज्यभर क्रिकेटसाठी मैदाने विकसित करण्याचे नवीन धोरण निश्चित केले आहे. याच धोरणांतर्गत कोल्हापूरातील न्यू इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी काॅलेज, उंचगाव येथील मैदानाच्या विकासासाठी ७५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य व मैदानासाठी लागणारी तांत्रिक मशिनरी मुख्यत्वे खेळपट्टी साठीचा रोलर, ग्रास कटर, लाॅन मुव्हर इत्यादी साहित्य पुरवण्याचे मान्य केले आहे. एमसीएचे सेक्रेटरी ॲड कमलेश पिसाळ, न्यू इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी काॅलेजचे डायरेक्टर डॉ संजय दाभोळे आणि केडीसीएचे माजी अध्यक्ष आर ए (बाळ) पाटणकर यांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.

या मैदानामुळे राज्यस्तरीय निमंत्रित क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणे सुलभ होईल. तसेच खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील त्यामुळे कोल्हापुरातील पुरूष आणि महिला खेळाडूंना विशेषत: ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जात्मक प्रगती साधता येईल.

या समझोता करारा प्रसंगी केडीसीएचे उपाध्यक्ष अभिजीत भोसले सेक्रेटरी शीतल भोसले, सहसचिव मदन शेळके व संचालक मंडळ उपस्थित होते. हे मैदान विकसित झाल्यानंतर केडीसीएच्या अंतर्गत तसेच एमसीएच्या निमंत्रित व इतर विविध स्पर्धा आयोजन प्रभावीपणे करता येणार आहे. या प्रकल्पाला केडीसीएचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, माजी सेक्रेटरी केदार गयावळ व ज्येष्ठ खेळाडू रमेश हजारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *