
ओम पाटीलचे धमाकेदार द्विशतक
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १६ लीग क्रिकेट स्पर्धेत डीव्हीसीए संघाने उत्तर विभाग संघाचा एक डाव आणि २५२ धावांनी पराभव केला. या सामन्यात ओम पाटील याने नाबाद २१३ धावा फटकावत सामनावीर पुरस्कार संपादन केला.
व्हेरॉक क्रिकेट अकादमी मैदानावर हा सामना झाला. डीव्हीसीए संघाने प्रथम फलंदाजी करताना ६८.२ षटकात पाच बाद ४६८ असा धावांचा डोंगर उभारुन डाव घोषित केला. त्यानंतर उत्तर विभाग संघाचा पहिला डाव ४२.५ षटकात १३८ धावांत गडगडला. त्यामुळे उत्तर विभागाला फॉलोऑन मिळाला. दुसऱया डावात उत्तर विभाग संघ २८.४ षटकात ७८ धावांत सर्वबाद झाला. डीव्हीसीए संघाने तब्बल एक डाव आणि २५२ धावांनी सामना जिंकला.
या सामन्यात डीव्हीसीए संघाच्या ओम पाटील याने दमदार द्विशतक साजरे केले. ओम पाटील याने २०८ चेंडूंचा सामना करत २१३ धावांची धमाकेदार खेळी साकारली. त्याने ३७ चौकार ठोकत मैदान गाजवले. आयुष घोलप याने ७५ चेंडूत ९५ धावांची आक्रमक खेळी केली. त्याचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. त्याने आपल्या वादळी खेळीत तब्बल सात षटकार व आठ चौकार ठोकले. अर्जुन गायकवाड याने ९० चेंडूत ७९ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने ११ चौकार मारले. गोलंदाजीत रुद्र पाटील याने ४५ धावांत आठ विकेट घेऊन सामना गाजवला. रुद्र पाटील याने दोन्ही डावात भेदक गोलंदाजी केली. प्रज्योत गुंडाळे याने ९ धावांत दोन गडी बाद केले.