
नवी दिल्ली ः इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताने साई सुदर्शनची निवड करावी, असे मत माजी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे.
इंग्लंडमधील परिस्थितीची माहिती असल्याने सुदर्शन याला भारतीय संघात ठेवणे भारतासाठी फायदेशीर ठरू शकते, असे रवी शास्त्री यांचे मत आहे. सुदर्शनने काउंटी हंगामात सरे संघाकडून अनेक वेळा खेळले आहेत.
जूनमध्ये भारताचा इंग्लंडचा दौरा
२०२३ मध्ये सुदर्शनने दोन सामन्यांमध्ये ३८.६६ च्या सरासरीने ११६ धावा केल्या. गेल्या वर्षी त्याने नॉटिंगहॅमशायरविरुद्ध शतक ठोकले आणि तीन सामन्यात १६५ धावा केल्या. आयपीएल २०२५ नंतर भारत जूनमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्याने भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या पुढील चक्राची सुरुवात करेल.
आयसीसी रिव्ह्यू प्रोग्राममध्ये रवी शास्त्री म्हणाले की, मला वाटते की हा तरुण खेळाडू साई सुदर्शन प्रत्येक फॉरमॅटचा खेळाडू आहे. तो एक हुशार क्रिकेटपटू आहे. एक गतिमान फलंदाज आणि इंग्लंडच्या परिस्थितीत तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्याने, तो भारतीय संघात असावा असे मला वाटते. मला वाटतं की या संघात सामील होऊ इच्छिणाऱ्या बाहेरील लोकांच्या यादीत तो वरच्या क्रमांकावर असेल.
सुदर्शन उत्तम फॉर्ममध्ये आहे
आयपीएल २०२५ च्या हंगामात साई सुदर्शन उत्तम फॉर्ममध्ये आहे. या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो ४५६ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सुदर्शनने नऊ सामन्यांमध्ये पाच अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या ८२ धावा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका २० जूनपासून सुरू होणार आहे, ज्याचा पहिला सामना हेडिंग्ले येथे खेळला जाईल.
मर्यादित षटकांच्या क्रिकेट आणि आयपीएलमध्ये भारतासाठी फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरचीही निवड होऊ शकते, परंतु त्याला कठीण स्पर्धेला तोंड द्यावे लागेल, असे शास्त्री म्हणाले. शास्त्री म्हणाले, श्रेयस पुनरागमन करू शकतो पण स्पर्धा कठीण असेल. पांढऱ्या चेंडूच्या स्वरूपात त्याची निवड निश्चित आहे, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये आपल्याला इतर खेळाडू कोण आहेत ते पहावे लागेल.