गुजरातचा हैदराबादवर विजय, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर

  • By admin
  • May 2, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

साई सुदर्शन, शुभमन गिल, जोस बटलरची दमदार फलंदाजी निर्णायक 

अहमदाबाद : साई सुदर्शन (४८), शुभमन गिल (७६), जोस बटलर (६४) यांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा ३८ धावांनी पराभव केला. अभिषेक शर्माची ७४ धावांची खेळी एकाकी झुंज ठरली. या विजयासह गुजरात संघाचे १४ गुण झाले आहेत. 

सनरायझर्स हैदराबाद संघासमोर विजयासाठी २२५ धावांचे लक्ष्य होते. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा या सलामी जोडीने ४.३ षटकात ४९ धावांची भागीदारी केली. प्रसिद्ध कृष्णा याने हेड याला २० धावावर बाद झाले.  त्याने चार चौकार मारले. हैदराबादने ४९ धावसंख्येवर पहिली विकेट गमावली. इशान किशन (१३) लवकर बाद झाला. त्याने १७ चेंडू खेळले पण एकही चौकार-षटकार त्याला मारता आला नाही. 

एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना सलामीवीर अभिषेक शर्मा याने धमाकेदार अर्धशतक ठोकले. अभिषेक याने आक्रमक फटकेबाजी सुरू ठेवत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. अनुभवी इशांत शर्मा याने अभिषेकची दमदार ७४ धावांची खेली संपुष्टात आणत संघाला मोठे यश मिळवून दिले. अभिषेक याने ४१ चेंडूंचा सामना करत ७४ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार व सहा उत्तुंग षटकार मारले. अभिषेक व क्लासेन या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. पाठोपाठ क्लासेन देखील बाद झाला. हा फार मोठा धक्का हैदराबाद संघाला बसला. प्रसिद्ध कृष्णा याने क्लासेनला २३ धावांवर बाद केले. त्याने एक चौकार व एक षटकार मारला. 

अभिषेक-क्लासेन बाद झाल्यानंतर हैदराबाद संघाचा पराभव निश्चित झाला. अनिकेत शर्मा (३), मेंडिस (०) हे लवकर बाद झाले. नितीन कुमार रेड्डी (नाबाद २१) व पॅट कमिन्स (नाबाद १९) यांचे प्रयत्न अपुरे ठरले. इशांत २ चेंडू टाकल्यानंतर जखमी झाला. त्यानंतर साई किशोर याने २०वे षटक पूर्ण केले. हैदराबाद संघाने २० षटकात सहा बाद १८६ धावा काढल्या. गुजरात संघाने ३८ धावांनी सामना जिंकला. सिराज (२-३३), प्रसिद्ध कृष्णा (२-१९) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. 

गुजरातची दमदार फलंदाजी 

कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकांच्या मदतीने गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादसमोर २२५ धावांचे लक्ष्य ठेवले. सनरायझर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गुजरातने २० षटकांत सहा गडी गमावून २२४ अशी धावसंख्या उभारली. गुजरातकडून गिलने ३८ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांसह सर्वाधिक ७६ धावा केल्या, तर बटलरने ३७ चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह ६४ धावा केल्या. सनरायझर्स संघाकडून जयदेव उनाडकट याने शेवटच्या षटकात तीन विकेट घेतल्या.

प्रथम फलंदाजी करताना गिल आणि सुदर्शन यांनी पुन्हा एकदा गुजरातला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. गिल आणि सुदर्शन यांच्या शानदार फलंदाजीच्या मदतीने गुजरातने पॉवर प्लेमध्ये सर्वोच्च धावसंख्या गाठली. यासह, सुदर्शनने टी २० मध्ये २००० धावा पूर्ण केल्या आणि कमी डावांमध्ये असे करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज बनला. तथापि, सुदर्शनला त्याचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही आणि तो ४८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर गिल आणि बटलर यांनी जबाबदारी स्वीकारली. गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले, परंतु धावबाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियन मध्ये परतला.

त्यानंतर बटलरने आपला आक्रमक डाव सुरू ठेवला आणि ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. बटलरही लांब शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. बटलर बाद झाला तेव्हा गुजरातचा स्कोअर २०० च्या पुढे गेला होता. पॅट कमिन्सने उनाडकट याला शेवटचं षटक टाकण्यासाठी पाठवले. त्याने दुसऱ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदर याला बाद केले. वॉशिंग्टन सुंदर १६ चेंडूत एका षटकारासह २१ धावा काढून बाद झाला. यानंतर, राहुल तेवतिया देखील पाचव्या चेंडूवर सहा धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्यानंतर सहाव्या चेंडूवर रशीद खान खाते न उघडताच बाद झाला. शाहरुख खानने दोन चेंडूत सहा धावा काढल्यानंतर नाबाद राहिला. उनाडकट व्यतिरिक्त, सनरायझर्स संघाकडून कमिन्स आणि झीशान अन्सारी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *