महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला संघाला सुवर्णपदक

  • By admin
  • May 4, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

पुणे : भारतीय हौशी जिम्‍नॅस्टिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र हौशी जिम्‍नॅस्टिक्स असोसिएशनच्या आयोजित राष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्‍नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या वरिष्ठ गटात महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकाविले. अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार्‍या या लढतीत महाराष्ट्राने १२७.२५ गुणांनी सोनेरी यशाला गवसणी घातली. महिलांच्या वरिष्ठ गटातील असमांतर बार्स प्रकारात महाराष्ट्राच्या अनुष्का पाटील हिने कांस्यपदक जिंकले.

बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. महिलांच्या आर्टिस्टिक जिम्‍नॅस्टिक्समधील वरिष्ठ गटाच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी थरारक लढतीत बाजी मारत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. मुंबईच्या अनुष्का पाटील व इशिता रेवाळे, ठाण्याची सारा राऊळ, पुण्याची शताक्षी टक्के, छत्रपती संभाजीनगरची रिद्धी हत्तेकर व मुंबईची रुजुल घोडके यांनी महाराष्ट्राला हे सुवर्णयश मिळवून दिले. 

या गटात यजमान महाराष्ट्राला रेल्वेच्या मुलींनी तोडीस तोड लढत दिली. स्‍पर्धेचा पदक वितरण समारंभ ऑलिम्‍पिकपटू दीपा कर्माकर व क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांच्‍या हस्ते झाला. यावेळी महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, द्रोणाचार्य पुरस्‍कार प्राप्‍त विश्वेश्रर नंदी, राज्य सरचिटणीस डॉ मकरंद जोशी व स्पर्धा संचालक प्रवीण ढगे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

अखेरच्या क्षणापर्यंत रेल्वेचा संघ २ गुणांनी आघाडीवर होता. मात्र, त्यांची एक खेळाडू बॅलन्स करताना खाली पडली अन् हीच गोष्ट महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी पुरेशी ठरली. रेल्वेला १२७ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पश्चिम बंगालने ११५.५५ गुण मिळवित कांस्यपदक जिंकले. महिलांच्या वरिष्ठ गटात असमांतर बार्स प्रकारात महाराष्ट्राच्या अनुष्का पाटील हिने ९.४३३ गुणांसह कांस्यपदक जिंकले. या प्रकारात रेल्वेच्या करिश्माचा करिश्मा बघायला मिळाला. तिने निर्विवाद वर्चस्वासह १०.५०० गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर आपला हक्क सांगितला. दिल्लीची स्नेहा तारियल रौप्य पदकाची मानकरी ठरली.

साक्षी दळवीचा पदकांचा चौकार
आर्टिस्टिक जिम्‍नॅस्टिक्स ज्युनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात ठाण्याच्या साक्षी दळवी हिने महाराष्ट्राला चार पदके जिंकून दिली. तिने वैयक्तिक ऑल राऊंड, फ्लोअर एक्सरसाईज व अनइव्हन बार्स या प्रकारात रौप्यपदकांची कमाई केली, तर वॉल्टींग टेबल प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली. वैयक्तिक ऑल राऊंड प्रकारात साक्षी दळवीने ४०.७५० गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. वॉल्टिंग टेबल व अनइव्हन बार्स या प्रकारात सरस कामगिरी केल्यानंतर बॅलन्सिंग बीम्स व फ्लोअर एक्सरसाईज या प्रकारात पिछाडीवर राहिल्यामुळे तिला सुवर्ण पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. 

त्रिपुराच्या श्रीपर्णा देबनाथ हिने अखेरच्या क्षणी मुसंडी मारत ४२.४०० गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकावर नाव कोरले. पहिल्याच स्पर्धेत तिने हे सुवर्ण यश संपादन केले,  गुजरातच्या अवंतिका नेगी हिने ४०.६५० गुण मिळवित कांस्यपदकावर हक्क सांगितला. युनेवन बार्स प्रकारात साक्षीने ८.२६७ गुणांसह रौप्यपदक पटकाविले. गुजरातच्या अवंतिका नेगीने ९.०६७ गुणांसह सुवर्णपदकावर मोहर उमटवली. गुजरातचे स्पर्धेतील हे एकमेव सुवर्णपदक ठरले. कर्नाटकच्या निह वार्गेस हिने कांस्यपदक जिंकले. फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात साक्षी दळवीने १० गुणांसह रौप्यपदकाला गवसणी घातली. त्रिपुराच्या श्रीपर्णा देबनाथ हिने १०.३०० गुणांसह सुवर्णपदक जिंकले, तर ९.६०० गुणांची कमाई करणारी तामिळनाडूची ओकेना थॉमस कांस्यपदकाची मानकरी ठरली. 

वाल्टिंग टेबल प्रकारात साक्षी दळवीला ११.७०० गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्रिपुराची श्रीपर्णा देबनाथ ११.८०० गुणांसह सुवर्णपदकाची मानकरी ठरली, तर पश्चिम बंगालच्या तोरा सानी हिने ११.७३३ गुणांसह रौप्यपदक जिंकले.

 
महाराष्ट्राला सर्वाधिक पदके
यजमान महाराष्ट्राने आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत २ सुवर्णांसह ७ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण सर्वाधिक १५ पदकांची लयलूट केली. मात्र, रेल्वेने ४ सुवर्ण, ६ रौप्य व २ कांस्य अशी एकूण १२ पदकांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राचा संघ सातव्या स्थानी राहिला. सेनादलाने ४ सुवर्ण, ४ रौप्य व ३ कांस्य अशी एकूण ११ पदके जिंकून सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले. पश्चिम बंगाल ४ सुवर्ण ३ रौप्य व ३ कांस्य अशा एकूण १० पदकांसह तिसर्‍या स्थानी राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *