
अंकुश मोरे यांच्या एकसष्ठीपूर्ती निमित्त गोरेगाव येथे आयोजन
मुंबई : कबड्डी हाच ध्यास आणि श्वास या जिद्दीने अखेर चार दशके कबड्डीच्या सेवेत वाहून घेतलेल्या ज्येष्ठ प्रशिक्षक आणि संघटक अंकुश मोरे यांच्या एकसष्ठीपूर्तीच्या निमित्ताने गोरेगावात महामुंबई कबड्डी लीग स्पर्धा १२ ते १८ मे या कालावधीत भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे.
अभिनव कला क्रीडा अकादमी, गोरेगाव यांच्या वतीने आणि मोरे यांच्या प्रेरणेतून ही स्पर्धा एनएनपी शाळेच्या भव्य क्रीडांगणात (प्लॉट नं. ८च्या बाजूला, नागरी निवारा शाळा, दिंडोशी, गोरेगाव पूर्व) भरवली जाणार आहे.
नेत्यांच्या झगमगाटापेक्षा खेळाडूंवर भर!
या स्पर्धेची सर्वात विशेष बाब म्हणजे अंकुश मोरे यांनी कोणत्याही राजकीय झगमगाटाची मदत न घेता ही स्पर्धा फक्त आणि फक्त खेळाडूंना व्यासपीठ मिळावे या हेतूने आयोजित केली आहे. हेच त्यांच्या क्रीडावेड्या आणि समर्पित व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे.
९५० खेळाडूंचा सहभाग
या स्पर्धेसाठी पार पडलेल्या निवड चाचणीत सुमारे ९५० मुले-मुलींनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्या उसळत्या उत्साहामुळेच ही स्पर्धा काही काळ पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता संपूर्ण तयारीनंतर स्पर्धा १२ मेपासून निश्चितपणे सुरू होत आहे.
कबड्डीप्रेमींनो, ही स्पर्धा म्हणजे युवा खेळाडूंना उभारी देणारा एक महोत्सव ठरणार आहे. कबड्डीचा जीव ओतणाऱ्या मोरे सरांच्या या उपक्रमाला सर्वांनी साथ द्यावी, मैदानात हजेरी लावून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.