
युनिव्हर्सल वन-डे लीग क्रिकेट ः सदगुरू रेड्डी, सोहम गिरीची धमाकेदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर १६ एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत जॉन्टी क्रिकेट अकादमी संघाने चॅम्पियन क्रिकेट अकादमी संघावर तब्बल १९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात सात धावांत पाच विकेट घेणारा सदगुरू रेड्डी हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सोहम गिरी याने १३२ धावांची खेळी करुन सामना गाजवला.
युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक राहुल पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन युनिव्हर्सल क्रिकेट ग्राउंडवर केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने युवा खेळाडूंना एकदिवसीय सामना खेळण्याचा चांगला अनुभव प्राप्त होत आहे. त्यामुळे ही स्पर्धा युवा खेळाडूंना लाभदायक ठरत असल्याचे राहुल पाटील यांनी सांगितले. या समन्यात जॉन्टी क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० षटकात सात बाद २६५ अशी भक्कम धावसंख्या उभारली. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात चॅम्पियन क्रिकेट अकादमी संघ २३ षटकांत केवळ ६८ धावांत गडगडला. त्यामुळे जॉन्टी अकादमीने हा सामना तब्बल १९७ धावांनी जिंकला.

या सामन्यात सोहम गिरी शानदार शतक साजरे केले. सोहमने १६२ चेंडूंचा सामना करत १३२ धावा फटकावल्या. सोहमने शतकी खेळी करताना १४ चौकार मारले. यश डोईफोडे याने ६४ चेंडूत ५२ धावांची दमदार खेळी केली. त्याने दहा चौकार मारले. पियुष कसबेकर याने ४४ चेंडूत ३१ धावांचे योगदान दिले. त्याने दोन चौकार मारले. गोलंदाजीत सदगुरू रेड्डी याने प्रभावी गोलंदाजी करत अवघ्या ७ धावांत पाच विकेट घेतल्या. या शानदार स्पेलमुळे त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. नितीन बोराडे याने चार धावांत दोन गडी बाद केले. समर्थ जोशी याने ५६ धावांत दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
जॉन्टी क्रिकेट अकादमी ः ५० षटकात सात बाद २६५ (सोहम गिरी १३२, यश डोईफोडे ५२, भार्गव सराफ १०, पियुष कसबेकर ३१, सदगुरू रेड्डी नाबाद ७, इतर २५, समर्थ जोशी २-५६, सुयोग घनवट १-५१, राजवीर परदेशी १-४१, इशांत बबीरवाल १-४६) विजयी विरुद्ध चॅम्पियन क्रिकेट अकादमी ः २३ षटकात सर्वबाद ६८ (सयाजी पाटील ९, समर्थ जोशी १८, इशांत बबीरवाल १५, सोहम ९, सदगुरू रेड्डी ५-७, नितीन बोराडे २-४, श्रावणी खडके १-१७, भार्गव सराफ १-२, पियुष कसबेकर १-३). सामनावीर ः सदगुरू रेड्डी.