विजेतेपदाच्‍या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र सज्‍ज       

  • By admin
  • May 4, 2025
  • 0
  • 32 Views
Spread the love

महाराष्ट्र-हरियाणामध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई

पाटना : खेलो इंडिया युथ गेम्सच्या सातव्‍या पर्वात सर्वसाधारण विजेतेपदाच्‍या हॅटट्रिकसाठी महाराष्ट्र सज्‍ज झाला आहे. स्‍पर्धेत पुन्‍हा एकदा महाराष्ट्र-हरियाणामध्ये वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. रविवारी तिरंदाजीच्या कम्पाऊंडमधील रँकिंग राऊंडमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी अव्‍वल स्‍थानावर झेप घेत स्‍पर्धेत दमदार प्रारंभ केला.

या स्पर्धेतील २७ पैकी २६  क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राचा बलाढ्य संघ मैदानात उतरला आहे. ४३७ खेळाडूंसह १२८ प्रशिक्षक, व्‍यवस्‍थापक असे एकूण ५६५ जणांचे पथक सहभागी होणार आहे. महिला खेळाडूंची संख्या सर्वाधिक २३८ असून १७७ मुले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ४४ खेळाडूंचा सर्वाधिक मोठा संघ हा जलतरणाचा आहे. गतवेळी जलतरणात २७ पदकाची लयलूट महाराष्ट्राने केली होती. यंदाही स्‍पर्धेच्‍या पहिल्‍या दिवसापासून महाराष्ट्राचा सुवर्णदिन पहाण्यास मिळणार आहे. 

दिल्‍लीत १० मे पासून होणाऱ्या जिम्‍नॅस्‍टिक्‍स क्रीडा प्रकारातही महाराष्ट्राचा बोलबाला असणार आहे. महाराष्ट्राच्‍या खेळाडूंना क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी दृकश्राव्‍य प्रणालीद्वारे शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

हॅटट्रिकसह विक्रमी पाचव्या विजेतेपदासाठी मराठमोळे क्रीडापटू उद्‌घाटनाच्‍या दिवसापासून झुंज देत आहेत. भागलपूर येथील आर्चरी रेंजवर गतविजेत्या महाराष्ट्र संघाने खेलो इंडिया युथ गेम्सच्या सातव्या पर्वाची आपल्या लौकिकास साजेशी सुरूवात केली. बुलढाण्याच्या तेजल साळवे हिने तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारात सर्वाधिक ६९७ गुणांचा वेध घेत रँकिंग राऊंडमध्ये प्रथम स्‍थान प्राप्‍त केले. पाठोपाठ. वैदेही जाधवने ६९२ गुणांची कमाई करीत दुसरा, तर प्रितिका हिने ६९० गुणांसह तिसरा क्रमांक निश्चित केला. मुलांच्या रिकर्व प्रकारात महाराष्ट्राच्या ज्ञानेश चेराळेने ६५१ गुणांसह तिसरे स्थान संपादून पदकाच्‍या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.

जलतरण, जिम्‍नॅस्‍टिक्‍स व ॲथलेटिक्‍समध्ये महाराष्ट्र पदकांच्‍या शर्यतीत पहिल्‍या दिवसापासून पदकतक्‍यात आघाडीवर असणार आहे. कुस्‍ती, मुष्टियुद्ध खेळात हरियाणा संघाची घोडदौड दिसेल. यंदाच्या स्पर्धेत महाराष्ट्र-हरियाणा यांच्यात कोण बाजी मारणार याकडे तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील. उत्तराखंडातील राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धेतील पदकविजेते खेळाडू पार्थ माने, शांभवी क्षीरसागर आर्चरीचे प्रितिका प्रदीप, वैष्णवी पवार हे वरिष्ठ गटातील पदकवीर युवा खेलो इंडियात सोनरी यशासाठी आतुर झाले आहेत.

२०१८ पासून दिल्ली येथून खेलो इंडिया स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिल्या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले होते. २०१९ साली पुणे, २०२० साली आसाम स्पर्धेत महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २०२२ साली मध्य प्रदेशमधील स्पर्धेत विजेतेपद महाराष्ट्राने खेचून आणले. गतवर्षी २०२३ मध्ये तामिळनाडूत महाराष्ट्र पुन्‍हा चॅम्‍पियन ठरला. गत तामिळनाडू स्‍पर्धेत ५७ सुवर्ण, ४८ रौप्य व ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदके मिळवून महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. मध्यप्रदेश पाठोपाठ तामिळनाडूत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.

आतापर्यंत झालेल्या सहा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने चार वेळा, तर हरियाणा संघाने दोन वेळा या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले आहे. गतविजेता महाराष्ट्र व हरियाणा या दोन तुल्यबळ संघांमध्ये पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई असेल. यावेळी देखील महाराष्ट्राकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *