
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, खेलो इंडिया युथ गेम्सचे उद्घाटन
पाटणा ः खेळाडूंना नवीन खेळ खेळण्याची संधी मिळायला हवी याकडे सरकारचे लक्ष आहे. क्रीडा बजेट सुमारे चार हजार कोटी आहे. देशात आज हजाराहून अधिक खेलो इंडिया केंद्रे सुरू आहेत. यापैकी दोन डझनहून अधिक बिहारमध्ये आहेत. आम्ही अभ्यासात खेळांचाही समावेश केला आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात खेळांना खूप महत्त्व आहे. तुम्हाला खेळाच्या मैदानावर तुमचे सर्वोत्तम द्यावे लागेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले. खेलो इंडिया युथ गेम्स पहिल्यांदाच बिहार राज्यात होत आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह बिहार सरकारचे सर्व प्रमुख मंत्री आणि अधिकारी उपस्थित आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी मशाल प्रज्वलित केली. या मेगा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशातील विविध राज्यांमधून एकूण ८,५०० खेळाडू दाखल झाले आहेत. हे सर्व खेळाडू २८ खेळांमध्ये २४३५ पदकांसाठी आपली ताकद दाखवत आहेत.
बिहारला डबल इंजिन सरकारची गरज
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. भारतातील खेळ एक संस्कृती म्हणून आपली ओळख निर्माण करत आहे. खेलो इंडिया युथ गेम्स हे देशातील तरुणांसाठी या दिशेने एक मोठे व्यासपीठ बनले आहे. कोणत्याही खेळाडूने आपली कामगिरी सुधारण्यासाठी जास्तीत जास्त सामने खेळणे आणि स्पर्धांमध्ये भाग घेणे खूप महत्वाचे आहे. एनडीए सरकारने याला प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारमधील वैभव सूर्यवंशी या लहान मुलाने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली. त्याच्या कामगिरीबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. या प्रसंगी मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांची भाषणे झाली.
अभिमानाचा क्षण
खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा बिहारमधील पाटणा, राजगीर, गया, भागलपूर आणि बेगुसराय या एकूण पाच शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. एकूण २८ गेममध्ये स्पर्धा आणि ई-स्पोर्ट्सच्या डेमो स्पर्धा असतील. देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे १०,००० खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी, तांत्रिक अधिकारी इत्यादींनी यात भाग घेतला. बिहार क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक रवींद्र शंकर म्हणाले की, राज्यात पहिल्यांदाच खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.