
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र राज्य हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने कुमीरा रावण शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या के आर एस स्पोर्ट्स अकादमी आयोजित दुसरी आमंत्रित राज्यस्तरीय नॉन कॉम्पिटिटिव आर्टिस्टिक व एक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा के आर एस स्पोर्ट्स अकादमी येथे उत्साहात पार पडली.
राज्यातून या स्पर्धेत मुंबई, ठाणे, नागपूर, वर्धा, नाशिक, रायगड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून २५० खेळाडूनी सहभाग नोंदवला. तर ४०० पेक्षा अधिक पालकांची उपस्थिती होती.
आर्टिस्टिक्स मुले आणि मुली वयोगट ६, ८, १०, १२ व १४ असा होता. तसेच एक्रोबॅटिक्स मध्ये वयोगट ११ ते १६ मधे महिला दुहेरी, मिश्र दुहेरी, पुरुष दुहेरी हे तीन प्रकार घेण्यात आले होते. खेळाचा प्रचार आणि प्रसार तसेच छोट्या वयोगटातील खेळाडूंसाठी एक मोठ्या स्तरावर स्पर्धा खेळण्याचा अनुभव यावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या के आर एस स्पोर्ट्स अकादमी खेळाडूंचा सर्व वयोगटात दबदबा राहिला. तसेच सांघिक विजेतेपद प्रथम क्रमांक के आर एस स्पोर्ट्स अकादमी संघाने पटकावला. दुसरा क्रमांक देव स्पोर्ट्स अकादमी रायगड तर तिसरे स्थान नाशिक जिल्हा युनिक जिम्नॅस्टिक्स अकादमी यांनी मिळवला.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून एसआरपीएफ १४ कमांडेड विक्रम साली, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, माजी क्रीडा उपसंचालक जगन्नाथ आधाने, एमजीएम विद्यापीठ क्रीडा विभाग प्रमुख डॉ दिनेश वंजारे, के आर एस स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष रावण शिंदे, जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेचे उपाध्यक्ष डॉ रणजीत पवार, राहुल तांदळ, संदीप गायकवाड, डॉ शशिकांत सिंग, डॉ श्रीनिवास मोतीयेळे, सूर्या उद्योग समुहाचे सुनील म्हस्के, संदीप म्हस्के हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकादमीचे सचिव आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रा. प्रवीण शिंदे आणि स्पर्धा प्रमुखाची भूमिका आंतरराष्ट्रीय पंच अरविंद शिंदे, तर पंचांची भूमिका आंतरराष्ट्रीय खेळाडू शुभम सरकटे, हर्षल आठवले, रिद्धी जैस्वाल, सलोनी म्हस्के, प्रिया आगिवले, बाबासाहेब आयवळे, सुनील माणकर, ज्योती शिंदे, मुकेश ग्यार, सिद्धांत सोनटक्के, नूपुर लाडवानी, क्रांतीकुमार नरवडे, संभाजी चव्हाण, आदित्य कदम, पार्थ रामशेतवाड, साहिल माळी यांनी बजावली तर बक्षिस समारंभ प्रियंका शिंदे व आभार प्रदर्शन विद्या शिंदे यांनी केले.
राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र राज्य हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे सचिव डॉ मकरंद जोशी यांनी सर्व अकादमीच्या पदाधिकाऱ्यांचे, सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच तसेच पालकांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.