
मनीष स्मृती चषक राज्यस्तरीय पुरुष खो-खो स्पर्धा
नवी मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने विहंग क्रीडा मंडळ आयोजित मनीष स्मृती चषक राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष खो-खो स्पर्धेची अंतिम फेरी पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघ व यजमान विहंग क्रीडा मंडळ यांच्यात रंगणार आहे. ही रंगतदार लढत ऐरोली येथील श्रीमती राधिका मेघे विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
या स्पर्धेत उपांत्य फेरीत पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने कुपवाड्याच्या राणा प्रताप तरुण मंडळाचा ११-१० असा एक डाव राखून एक गुणाने दणदणीत पराभव केला. या सामन्यात नव महाराष्ट्राच्या राहुल मंडल (नाबाद २.२० मि. संरक्षण व १ गुण), सुयश गरगटे (१.३०, २.३० मि. संरक्षण), ऋषभ वाघ (२ मि. संरक्षण व १ गुण), शिवराम शिंगाडे (२.२० मि. संरक्षण), अथर्व ढाणे (१.१०, १.३० मि. संरक्षण), रुद्र थोपटे (४ गुण) यांच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर विजयाची नोंद केली. तर पराभूत राणा प्रताप तरुण मंडळाच्या आयुष लाड व सौरभ घाडगे (प्रत्येकी १.१० मि. संरक्षण व १ गुण), साहिल वालकर (१ मि. संरक्षण व २ गुण) यांच्याशिवाय इतर कोणालाही उल्लेखनीय कामगिरी करता न आल्याने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले
दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान विहंग क्रीडा मंडळाने शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीचा १२-१० असा ३.४० मि. राखून २ गुणांनी विजय साजरा केला. विहांच्या गजानन शेंगा ळ (१.३०, २.४० मि. संरक्षण व ३ गुण), महेश शिंदे (१, ३ मि. संरक्षण), आकाश तोगरे (१.३०, १.५० मि. संरक्षण), आकाश कदम (३ गुण) यांनी विजयाची पायाभरणी केली. तर पराभूत शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमीच्या हर्षद हातणकर (१.४०, २.३० मि. संरक्षण, २ गुण), निहार दुबळे (२.१० मि. संरक्षण व ३ गुण), दीपक माधव, रामचंद्र झोरे, निखिल सोडये व प्रतिक देवरे (प्रत्येकी १.१० मि. संरक्षण) यांना आपली कामगिरी उंचावतांना आल्याने पराभवाचा सामना करावा लागला.