फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा
अमरावती : ७१व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील उपविजेत्या भारतीय रेल्वे संघाबरोबरचा सामना ३६-३६ अशा बरोबरीत रोखून महाराष्ट्र संघाने आपल्या ताकदीची झलक दाखवली. पण राजस्थानकडून झालेल्या नाट्यमय पराभवामुळे महाराष्ट्राचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.
संत गाडगे महाराज समाधी मंदिर मैदानावर रंगलेला हा ब गटातील सामना चुरशीचा ठरला. पहिल्या सत्रात महाराष्ट्र २०-२१ अशा पिछाडीवर असतानाही दुसऱ्या सत्रात त्यांनी ताकदीची मुसंडी मारली आणि शेवटच्या क्षणापर्यंत दोन गुणांनी आघाडी घेतली. पण शेवटच्या मिनिटात संयम ढळल्यामुळे बरोबरीवर समाधान मानावे लागले.
आदित्य शिंदे व शिवम पठारे यांच्या कल्पक चढाया
संघनायक संकेत सावंत याची भक्कम पकड, या त्रयीने रेल्वेसमोर धडाडीचे आव्हान उभे केले होते. राजस्थानविरुद्धच्या सामन्यातही महाराष्ट्राने १० गुणांची आघाडी गमावून पराभव पत्करला होता. तोच संयमाचा अभाव आणि शेवटच्या क्षणाची निष्काळजीपणा पुन्हा डोकावला आणि उपांत्य फेरीचे स्वप्न धूसर झाले.
विदर्भ संघावर मोठा विजय
या आधीच्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान विदर्भ संघावर ४७-१६ अशी दणदणीत मात केली होती. शिवम पठारे व संकेत सावंतच्या जोडीने रक्षण व आक्रमणात तडाखा दिला होता. भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या आयोजनात ही स्पर्धा रंगली असून, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेला झुंजार खेळ भविष्यकाळासाठी आशादायक मानला जात आहे.