नाशिक संघाचा पूर्व विभागावर डावाने विजय

  • By admin
  • May 5, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

अक्षत भांडारकर, सायुज्य चव्हाण यांची धमाकेदार शतके, सामनावीर देवांश गवळीचे दहा बळी

नाशिक ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १६ निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत अक्षत भांडारकर (१९२), सायुज्य चव्हाण (१०२), देवांश गवळी (१० विकेट) यांच्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर नाशिक संघाने पूर्व विभाग संघाचा एक डाव आणि तब्बल २६३ धावांनी पराभव केला. या सामन्यात गोलंदाजीत आपला ठसा उमटविणारा देवांश गवळी हा सामनावीर ठरला.

क्रिडक क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. नाशिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ६९.३ षटकात पाच बाद ४५४ असा धावांचा डोंगर उभारत डाव घोषित केला. त्यानंतर पूर्व विभागाचा पहिला डाव ४२.४ षटकात अवघ्या ८७ धावांत गडगडला. त्यामुळे नाशिक संघाने पूर्व विभागाला फॉलोऑन दिला. फॉलोऑनमध्ये खेळताना पूर्व विभाग संघ ४६.४ षटकात १०२ धावांत गारद झाला. नाशिक संघाने एक डाव आणि २६३ अशा मोठ्या फरकाने सामना जिंकला.

या सामन्यात अक्षत भांडारकर याने १४९ चेंडूंत १९२ धावांची वादळी खेळी केली. त्याचे द्विशतक अवघ्या आठ धावांनी हुकले. या बहारदार खेळीत अक्षत याने १७ चौकार व ६ टोलेजंग षटकार मारले. सायुज्य चव्हाण याने ९० चेंडूत १०२ धावांची वेगवान खेळी केली. त्याने शतकी खेळी करताना १२ चौकार मारले. श्रेयस हेकारे याने ६० चेंडूत ६१ धावा काढल्या. त्याने नऊ चौकार मारले. गोलंदाजीत नाशिकच्या देवांश गवळी याने दहा विकेट घेऊन सामना गाजवला. देवांश गवळी याने या सामन्यात (६-१६ व ४-२३) प्रभावी स्पेल टाकला. दोन्ही डावात त्याने प्रभावी मारा करत संघाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. प्रिन्स पटेल याने १९ धावांत चार विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक

नाशिक ः पहिला डाव ः ६९.३ षटकात पाच बाद ४५२ डाव घोषित (मुज्तबा सय्यद ४१, श्रेयस हेकारे ६१, नाईक रोशन घाटे ३०, अक्षत भांडारकर १९२, सायुज्य चव्हाण नाबाद १०२, रुद्र मेणे ११, इतर १५, एम डी सय्यद २-८४, स्वराज देशमुख २-१०९).

पूर्व विभाग ः पहिला डाव ः ४२.४ षटकात सर्वबाद ८७ (समर्थ देशपांडे २०, सय्यद शहेज ३०, शिवम भोसले १८, देवांश गवळी ६-१६, दिव्येश साळवे २-१६, सायुज्य चव्हाण १-१२).

पूर्व विभाग ः दुसरा डाव ः ४६.४ षटकात सर्वबाद १०२ (शिवम भोसले २०, राजवीर ११, विश्वराज भोसले २९, इतर २०, देवांश गवळी ४-२३, प्रिन्स पटेल ४-१९, ओजस शिरुळे २-११).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *