
सोहम कुलकर्णी, श्रावण माळी, खुशाल परळकरची चमकदार कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १४ निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत सोलापूर संघाने नंदुरबार संघावर दहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या लढतीत सोहम कुलकर्णी हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

एडीसीए क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. नंदुरबार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नंदुरबार संघाचा पहिला डाव अवघ्या २५.२ षटकात ७५ धावांत गडगडला. त्यानंतर सोलापूर संघाने पहिल्या डावात ५६.४ षटकात नऊ बाद २०५ अशी धावसंख्या उभारुन डाव घोषित केला. नंदुरबार संघाने दुसऱया डावात ६१.२ षटकात सर्वबाद १७८ धावा काढल्या. सोलापूर संघाने ७.२ षटकात बिनबाद ४९ धावा फटकावत दहा विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात खुशाल परळकर याने १०९ चेंडूत ७३ धावांची दमदार खेळी केली. त्याने १२ चौकार मारले. दर्शिल फाळके याने ३८ चेंडूत ५६ धावा काढल्या. त्याने ७ चौकार व ३ षटकार ठोकले. राम खोमणे याने ४८ धावांची खेळी साकारताना ८ चौकार व १ षटकार मारला.
गोलंदाजीत सोहम कुलकर्णी याने १६ धावांत सहा विकेट घेत आपला ठसा उमटवला. युवराज शर्मा याने ३६ धावांत चार गडी बाद केले. श्रावण माळी याने १६ धावांत चार विकेट घेतल्या.