
भागलपूर/गया (बिहार) : अपेक्षेप्रमाणे सातव्या खेलो इंडिया तिरंदाजीसह मल्लखांब प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाकडे वाटचाल कायम राखली आहे. तिरंदाजीत महाराष्ट्राचे सात खेळाडू पदकासाठी भिडणार असून, यातील सहा पदके, तर आताच निश्चित आहेत. मल्ल्खांबमध्येही लौकिकाला साजेशी कामगिरी करीत सांघिक प्रकारात मुलांनी आघाडी घेतली आहे. खोखोत पंजाबचा ५८-९ गुणांनी धुव्वा उडवून महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी दिली.

भागलपूर येथे सुरू असलेल्या तिरंदाजी स्पर्धेत सलग दुसरा विजय महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजविला. मुलींच्या तिरंदाजीच्या कम्पाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या तेजल साळवे व प्रीतिका प्रदीप यांच्यामध्ये अंतिम लढत रंगणर असून, महिलांच्या रिकर्व प्रकारातही शर्वरी शेंडे व वैष्णवी पवार या महाराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यांमध्येच सुवर्ण पदकांची लढत रंगणार आहे. म्हणजेच ही चारही पदके महाराष्ट्राच्याच झोळीत पडणार आहेत. याचबरोबर मुलांच्या रिकर्व प्रकारात महाराष्ट्राच्या उज्वल ओलेकरने अंतिम फेरी गाठली असून, मुलांच्या कंपाऊंड प्रकारातही मानव जाधव अंतिम फेरीत दाखल झाला आहे. म्हणजेच महाराष्ट्रासाठी ही दोन पदकेही निश्चित झाले आहे.
मुलींच्या कम्पाऊंड प्रकारात महाराष्ट्राची वैदेही जाधव कांस्यपदकासाठी लढणार आहे. हेही पदक मिळाले, तर तिरंदाजीत महाराष्ट्राला सात पदके मिळणार आहेत. अव्वल मानांकित श्रावणी शेंडे हिने उपांत्य फेरीत हरियाणाच्या तमन्ना गुल्ला हिचा ६-० गुण फरकाने धुव्वा उडविला. दुसर्या उपांत्य लढतीत वैष्णवी पवार हिने झारखंडच्या तमन्ना वर्माचा ७-१ असा पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या मानव जाधवने उपांत्य फेरीत पंजाबच्या सुखमनदीप सिंग याचा चुरशीच्या लढतीत १४८-१४७ असा निसटता विजय मिळविला. आता सुवर्णपदकाच्या लढतीत त्याची गाठ झारखंडच्या दलवांशू सिंग याच्याशी पडेल.
तेजल साळवेने उपांत्य लढतीत तामिळनाडूच्या मधुरावर्षीनी हिचा १४१-१३९ गुण फरकाने पाडाव करीत अंतिम फेरीत धडक दिली. दुसर्या उपांत्य लढती महाराष्ट्राच्या प्रितिका प्रदीप हिने आपलीच राज्य सहकारी वैदेही जाधव हिच्यावर १४४-१४१ अशी मात करीत आगेकूच केली. त्यामुळे आता वैदेही व मधुरावर्षीनी यांच्यात कांस्यपदकाची लढत रंगणार आहे. दुसरीकडे उज्वल ओलेकरने उपांत्य लढतीत मेघालयच्या देवराज महापात्रा याचा ६-२ सेटने पराभव करीत अंतिम फेरी निश्चित केली. सुवर्णपदकाच्या लढतीत त्याची गाठ तामिळनाडूच्या स्मारण सर्वेश याच्याशी पडणार आहे.
मल्लखांबात महाराष्ट्राची आघाडी
ऐतिहासिक गया शहरातील आयआयएम संस्थेच्या सभागृहात सुरू असलेल्या सांघिक मल्लखांब प्रकारात महाराष्ट्राने आपली आघाडी कायम राखली आहे. सुवर्णपदकासाठी महाराष्ट्रासमोर मध्यप्रदेश, तामिळनाडू व छत्तिसगड संघाचे आव्हान असणार आहे. आयुष काळंगे, निशांत लोखंडे, ओम गाढवे, निरंजन अमृते, आर्यन आबोडकर व प्रज्ञेश तावडे यांच्या संघाने सांघिक मल्लखांबच्या तिन्ही प्रकारात संध्याकाळच्या सत्रापर्यंत आघाडी कायम राखली होती. अनुभवी आयुष काळंगे, व निशांत लोखंडे यांनी सलग दुसर्या खेलो इंडिया स्पर्धेतील पदकासाठी प्रदर्शन केले. प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेत खेळणार्या ओम गाढवे व निरंजन अमृते यांनी तिन्ही प्रकारात लक्षवेधी प्रदर्शन करीत पदकाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. मल्लखांबच्या मैदानातही सलग ७ व्या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी महाराष्ट्राने वाटचाल सुरू केली आहे. मुलींच्या गटात पंजाबचा ५८-९ गुणांनी पराभव करीत महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी दिली. तन्वी भोसले, विश्वकरंडक विजेती अश्विनी शिंदे, दिव्या पाल्य, सरिता दिवा यांनी अष्टपैलू खेळी करीत दणदणीत विजय संपादन केला.