सिद्धेश घोरपडेला सुवर्ण; आकांक्षा म्हेत्रेचा दुहेरी धमाका

  • By admin
  • May 6, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

नवी दिल्ली : सिद्धेश घोरपडेने सातवी खेलो इंडिया युवा स्पर्धेतील सायकलिंगच्‍या स्क्रॅच रेस प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देत मंगळवारचा दिवस गाजवला. मुलींच्या गटात मराठमोळ्या आकांक्षा म्हेत्रे हिने मेडल टाईम ट्रायल प्रकारात रौप्य, तर स्क्रॅच रेस प्रकारात कांस्यपदकाची कमाई करीत दुहेरी धमाका केला.

राजधानी नवी दिल्लीतील यमुना वेलोड्रम इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मुलांच्या १० किलो मीटर स्क्रॅचरेसमध्ये अतिशय चुरशीचा खेळ बघायला मिळाला. महाराष्ट्राच्या सिद्धेश घोरपडेला महावीर सारन व सिताराम बेनिवले या राजस्थानी सायकलपटूंकडून कडवी लढत मिळाली. मात्र, अखेरच्या काही मीटरमध्ये सिद्धेशने जिवाचे रान करीत १३ मिनिटे २६.५८४ सेंकद वेळेसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. महावीर सारनला १३ मिनिटे २६.६०१ सेंकद वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. फिनिशिंग लाईनला सिद्धेश याने बाजी मारली. सितारामने १३ मिनिटे २७.९३३ सेंकद वेळेसह कांस्यपदक जिंकले. सिद्धेश घोरपडे हा पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू असून, प्रशिक्षक दीपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे सोनेरी यश मिळविले.

आकांक्षा म्हेत्रेला रौप्य आणि कांस्य
मुलींच्या ७.५ किलो मीटरच्या स्क्रॅच रेस प्रकारात आकांक्षा म्हेत्रेला आपला राज्य सहकारी सिद्धेश घोरपडेच्या सोनेरी यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. महाराष्ट्राच्या या सायकलपटूला (११ मिनिटे ५१.६४९सें.) एका सेंकदाच्या फरकामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यावरून ही शर्यत किती अटीतटीची झाली असेल, याचा सहज अंदाज येतो. राजस्थानच्या हर्षिता जाखरने ११ मिनिटे ५०.९७३ सेंकद वेळेसह सुवर्णपदक, तर यजमान बिहारच्या सुहानी कुमारी हिने ११ मिनिटे ५१.५५८ सेंकद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली.

महाराष्ट्राच्या आकांक्षा म्हेत्रे हिला सायकलिंगच्या मेडल टाईम ट्रायल (केटीटी) प्रकारात सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. तिने ३८.७४२ सेंकद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली. राजस्थानच्या हर्षिता जाखर हिने ३८.६३१ सेंकद   वेळेसह सुवर्णपदक जिंकले, तर तामिळनाडूची एस थाबिथा ३९.४५४ सेंकद वेळेसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. महाराष्ट्राला सायकलिंगमध्ये दोन पदके जिंकून देणारी आकांक्षा म्हेत्रे ही मूळची जळगावची आहे. मात्र, ती पुण्यात दर्शन बारगुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *